सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याचं ट्वीट केलं आहे. या ट्वीटनंतर वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, याबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांना सवाल केला असता केसरकर यांनी उत्तर देणं टाळलं.
दीपक केसरकर म्हणाले की, अंजली दमानिया यांच्या प्रश्नांवर मी उत्तर द्यायला लागलो तर कसं व्हायचं. त्या ट्वीटबद्दल तुम्ही दमानियांना विचारलं पाहिजे. त्यांना तुम्ही विचारा की, सुप्रीम कोर्टाकडून त्यांना काही निरोप आला आहे का. मुळात सुप्रीम कोर्टाबद्दल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपण सर्वांनी स्वीकारला पाहिजे.
अंजली दमानियांचा दावा काय?
अंजली दमानिया म्हणाल्या, “आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, १५ आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपाबरोबर जाणार आहेत. तेही लवकरच. महाराष्ट्राच्या राजकारणाची आणखी किती दुर्दशा होतेय ते बघू.”
पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चा अधून मधून होत असतात. अंजली दमानियांनी याआधीही असा दावा केला आहे. अशातच त्यांच्या आजच्या ट्वीटने या चर्चांना आणखी वेग आला आहे.
हे ही वाचा >> “अजित पवारांकडून माझ्या जिवाला धोका”, पुण्यातील भाजपा पदाधिकाऱ्याची पोलिसात तक्रार
काय म्हणाले अजित पवार?
दरम्यान, अंजली दमानियांच्या दाव्याबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांना विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले, “एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार आहे.”