Deepak Kesarkar on Eknath Shinde Deputy Chief Minister Of Maharashtra : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज (गुरुवार, ५ डिसेंबर) देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होणार आहे. त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार देखील शपथ घेणार आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार आहे की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. बुधवारी दुपारी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की आज रात्रीपर्यंत चित्र स्पष्ट होईल. मात्र महायुती किंवा शिवसेनेकडून (शिंदे) याबाबत कोणतीही माहिती दिली गेली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही याबाबत अनेकांच्या मनात साशंकता आहे. यावर शिंदे यांचे निकटवर्तीय व शिवसेनेचे (शिंदे) आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “काल आमची शिवसेना (शिंदे) आमदारांची व नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली त्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे”.
दीपक केसरकर म्हणाले, “एकनाथ शिंदे आज शपथ घेणार की नाही याबाबत ते स्वतःच सांगू शकतील. मात्र, काल आमची शिवसेना आमदारांची व नेत्यांची बैठक पार पडली. त्या बैठकीत आम्ही एकनाथ शिंदे यांना स्पष्ट सांगितलं आहे की तुम्हाला मंत्रिमंडळात यावं लागेल. तुम्ही उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला हवं. आमचा देखील असा हट्ट आहे. आम्ही शिंदे यांना सांगितलं आहे की तुम्ही मंत्रिमंडळात नसाल तर आम्ही देखील मंत्री म्हणून शपथ घेणार नाही. मंत्रिमंडळात सहभागी होण्याबाबत एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता दर्शवली आहे”.
एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदी व अमित शाह यांचं ऐकतात : दीपक केसरकर
माजी शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, “एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं ऐकतात. अडीच वर्षांपूर्वी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना संदेश दिल्यानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्याचप्रमाणे आता देखील तसं होऊ शकतं. मोदी व शाह यांचा एकनाथ शिंदे यांना तसा संदेश आल्यावर ते योग्य तो निर्णय घेतील. अडीच वर्षांपूर्वी जी स्थिती होती तशीच स्थिती आता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांचं ऐकतात. आमचे पक्ष जरी वेगवेगळे असले तरी आमची तत्त्वं एकच आहेत, आमचा विचार एक आहे, आमचे नेतेही एकच आहेत. महाराष्ट्रात आमचे नेते एकनाथ शिंदे आहेत तर देशपातळीवर नरेंद्र मोदी व अमित शाह यांचं नेतृत्व आम्ही स्वीकारलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह आम्ही सर्वच जण मोदी आणि शहांचं नेतृत्व मानतो”.