मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप आणि अजित पवारांच्या महायुतीतल्या प्रवेशामुळे महायुतीत सर्वकाही आलबेल नाही, असा दावा महाविकास आघाडीतले नेते करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला, महायुतीतले नेते म्हणत आहेत की, सध्या महाविकास आघाडीतले लोक आत्तापासूनच भांडू लागले आहेत. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातल्या नुकत्याच झालेल्या भेटीमुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. शरद पवारांच्या भूमिकेबाबत संभ्रम असल्याचं महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी बोलून दाखवलं आहे. यावरूनच शिवसेनेच्या शिंदे गटाने महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे.
दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, ज्या प्रकारचं वक्तव्य संजय राऊत यांनी शरद पवारांबाद्दल केलं ते ऐकल्यानंतर आणि एकंदरित तिथलं वातावरण बघितल्यावर लक्षात येतंय की हे (महाविकास आघाडी) आत्ताच भांडतायत. हे लोक पुढे काय करू शकतील त्याचं चित्र यांनी आत्ताच उभं केलं आहे, याची नोंद ही महाराष्ट्रातली जनता घेईल. तुम्ही (प्रसारमाध्यमं) याला आघाडी म्हणत असला तरी तिथे तसं चित्र नाही. प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष) यांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे की या महाविकास आघाडीशी त्यांचा काही संबंध नाही, माझं जे काही बोलणं झालंय ते उबाठाशी (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) झालंय.
हे ही वाचा >> “मी नाराज नाही, पण आमची नाराजी दूर करणारा…”, ‘त्या’ प्रश्नावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया
काय म्हणाले होते संजय राऊत?
अजित पवार आणि शरद पवारांमधील बैठकीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी याबद्दल रोहित पवार, अजित पवार आणि शरद पवारांना प्रतिक्रिया विचारली. या प्रतिक्रियांबद्दल संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले होते की “रोहित पवार, शरद पवार यांची वक्तव्ये मी पाहिली. शरद पवार म्हणाले ते माझे पुतणे आहेत. रोहित पवारांचंही नातीगोती सांभाळायची वगैरे वक्तव्य मी ऐकलं. पण मग कार्यकर्त्यांनी रस्त्यावर का लढायचं? असा प्रश्न आहे. उद्या जर आम्ही (ठाकरे गट) एकनाथ शिंदेंबरोबर किंवा त्यांच्या बेईमान गटाबरोबर (शिंदे गट) रोज चहा प्यायला बसायला लागलो तर काय होईल? आम्ही नेत्यांनी त्यांच्याबरोबर बसायचं, नातीगोती सांभाळायची आणि खाली कार्यकर्त्यांनी मात्र आपल्या विचारसरणीसाठी एकमेकांविरोधात लढायचं? मला वाटतं शिवसेनेच्या डीएनएमध्ये असं ढोंग नाही”, अशा शब्दांत राऊत यांनी शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.