केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे थोरले पूत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सक्रीय राजकारणाला रामराम ठोकला आहे. राजकारणात आता मन रमत नाही, असं सांगत त्यांनी राजकारणातून बाजूला होत असल्याचं जाहीर केलं आहे. एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर त्यांनी याबाबतची पोस्ट करून दसऱ्याच्या दिवशीच त्यांच्या राजकीय समर्थकांना धक्का दिला आहे. भाजपा नेते निलेश राणे यांच्या या निर्णयावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते दीपक केसरकर यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
दीपक केसरकर म्हणाले, प्रत्येकाला स्वतःचे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. परंतु, मला वाटतंय की निलेश राणे यांनी त्यांचे वडील नारायण राणे आणि कुटुंबातील इतर सदस्यांशी बोलूनच निर्णय घ्यायला हवा. एखाद्या भावनेपोटी आपण सक्रीय राजकारणातून निवृत्त होतो असं म्हणतो. परंतु, राजकारण हे समाजसेवेचं एक माध्यम असतं. आपण एखाद्या पदावर काम करतो तेव्हा आपण लोकांसाठी काहीतरी करू शकतो. परंतु, तेच काम आपण व्यक्तीगत पातळीवर करू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की, ज्याला सामाजिक कामाची आवड आहे त्याने असा निर्णय घेऊ नये.
शालेय शिक्षणंत्री दीपक केसरकर म्हणाले, “निलेश राणे यांना कुटुंबातूनच राजकीय वारसा मिळाला आहे. त्यामुळे मला आसं वाटतं की, निलेश राणे यांनी असा कुठलाही विचार करण्यापूर्वी किंवा निर्णय घेण्यापूर्वी नारायण राणे यांच्याशी चर्चा करावी.” केसरकर हे एबीपी माझाशी बोलत होते.
निलेश राणे यांनी राजकारणातून बाजूला होण्यामागचं कारण काय?
निलेश राणे यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मी सक्रीय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकारणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९/२० वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्याबरोबर राहिलात, त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. भाजपात मला खूप प्रेम मिळालं आणि भाजपासारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी खूप नशीबवान आहे.
निलेश राणे यांनी म्हटलं आहे की, निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील, पण जिथे मनाला पटत नाही तिथे स्वतःचा आणि इतरांचा वेळ वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.”