ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा होती. या सभेतून त्यांनी शिंदे गटासह भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावरही टीकास्र सोडलं. आम्हाला निवडणूक आयोगाचा निर्णय अमान्य आहे, असंही त्यांनी म्हटलं.
उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही मान्य नसतो, असा टोला दीपक केसरकरांनी लगावला. ते अहमदनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
‘निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही’ या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याबद्दल विचारलं असता दीपक केसरकर म्हणाले, “उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही मान्य नसतो. त्यांना काहीच मान्य नसतं. प्रत्येकाला बरखास्त करण्याची त्यांना सवय झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात वेळ कसा काढायचा, हे सगळं त्यांनी केलं. आम्ही काही केलं नाही. आम्ही नेहमी त्यांचा आदर ठेवला आहे. आज एवढे मोठे-मोठे निर्णय महाराष्ट्रात होत आहेत, असे निर्णय त्यांच्या काळात का झाले नाहीत, हाही प्रश्न आहे.”
“शेवटी जनतेला न्याय द्यावा लागतो, तो तुम्ही देऊ शकला नाहीत. म्हणून तुमचं मुख्यमंत्रीपद गेलं. आम्ही तुमचं पद काढून घेतलं नाही, आम्ही तुम्हाला सांगत होतो, तुम्हीच मुख्यमंत्री राहा, परंतु मूळ विचारधारेबरोबर राहा, एवढीच आमची अपेक्षा होती. लोकांनी ज्या कारणासाठी निवडून दिलंय, त्यासाठी राहा. पण तुम्ही आमचं ऐकलं नाही म्हणून तुमचं पद गेलं. दुसरं कशामुळेच पद गेलं नाही,” अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली.