शिवसेना नेते आणि माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. राणेंना दीपक केसरकर असा प्रश्न पडत असेल तर राणेंनी त्यांचा आणि त्यांच्या मुलाचा खासदारकीत झालेला पराभव आठवावा, असा खोचक टोला केसरकरांनी लगावला. तसेच विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे पोरकटपणा करू नका म्हणत झाल्याचंही केसरकर यांनी सांगितलं.
दीपक केसरकर म्हणाले, “नारायण राणेंनी मला कितीही हिणवलं तर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे मी राणेंचा दहशतवाद मोडून काढला. ते माझे व्यक्तिगत शत्रू नाही, आजही मी राणेंच्या मुलांना सुधरा म्हणून सांगतो. सुधारले तरच मुलांचं पुढलं आयुष्य चांगलं असेल. अन्यथा जसा नारायण राणे यांचा राजकीय अंत झाला, तसाच अंत राणेंच्या मुलांच्या राजकीय कारकीर्दीचाही होईल.”
“… केवळ म्हणून नारायण राणेंचा मुलगा निवडून आला”
“कोणत्याच कोकणाच्या माणसाचा कमीपणा व्हावा असं मला कधीच वाटलं नाही. मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मी ३ वेळा आमदार झालो. दुसरीकडे नारायण राणे पराभूत झाले. राणेंचा मुलगा केवळ तिरंगी लढत होती म्हणून निवडून आला ही देखील वस्तूस्थिती आहे,” असं केसरकरांनी सांगितलं.
“पोरकटपणा करू नका म्हणत फडणवीसांनी नारायण राणेंच्या मुलांना झापलं”
दीपक केसरकर पुढे म्हणाले, “आज नारायण राणे यांची मुलं कशी वागतात, स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना असा पोरकटपणा करू नका म्हणत झापलं. अजूनही नारायण राणे त्यांच्या मुलांवर नियंत्रण आणू शकले नाही, तर त्यांची दुसरी टर्म देखील अशीच फूकट जाईल. मी काही राणेंचा शत्रू नाही, पण दुसऱ्यांना कमी लेखायचं बंद करा.”
“राणेंनी मला डीपीसीच्या बैठकीत हिणवलं होतं, तेव्हा मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की, आज तुम्ही ज्या खुर्चीत बसला आहात त्याच खुर्चीवर मी बसेन आणि तेव्हा राणे सभागृहात नसतील. हे नियतीने खरं करून दाखवलं आहे,” असंही दीपक केसरकर यांनी नमूद केलं.
“नारायण राणे आपण किती शूर आहोत हे दाखवत असले, तरी..”
दीपक केसरकर म्हणाले, “नारायण राणे यांचा तोल गेलाय. राणे आपण किती शूर आहोत हे राणे दाखवत असले तरी ते पोलिसांना घाबरतात. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच नारायण राणे यांची रविवारची (२७ डिसेंबर) पत्रकार परिषद कुणावर आरोप करण्यापेक्षा आपल्या मुलाला वाचवण्यासाठी होती. प्रत्येक निवडणुकीला तुम्ही लोकांना धमकी देऊन निवडून येणार हा काळ आता संपला आहे.”
हेही वाचा : दीपक केसरकरांची नारायण राणेंवर घणाघाती टीका
“कोण दीपक केसरकर या प्रश्नाच्या उत्तरासाठी ‘ती’ घटना आठवा”
“कोण दीपक केसरकर या प्रश्नाचं उत्तर आठवायचं असेल तर तुमचा आणि तुमच्या मुलाचा खासदारकीत झालेला पराभव आठवा. तुमच्या लक्षात येईल की कशाचीही परवा न करता जीवाची बाजी लावून जो लढला तो सर्वसामान्य कोकणचा माणूस होता. त्या कोकणाच्या माणसांचं प्रतिनिधित्व मी करतो म्हणूनच मी नारायण राणे यांना हरवू शकलो. आजही माझ्याशी लढाई करायची असेल तर ती विकासाच्या कामावर करा. राणे मुख्यमंत्री असूनही २५ वर्षात जेवढा निधी आणू शकले नाही तेवढा मी ५ वर्षात आणला,” असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.