विधानसभेच्या कसबा आणि चिंचवड या जागांसाठी पोटनिवडणूक घेतली जात आहे. मात्र या दोन्ही जागांवर बिनविरोध निवडणूक व्हावी, असा प्रयत्न भाजपा, शिंदे गटाकडून केला जात आहे. त्यासाठी शिंदे गट-भाजपाने विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा सुरू केल्याचे म्हटले जात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील या निवडणुका बिनविरोध कराव्यात, असे आवाहन केले आहे. याच निवडणुकीवर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज (५ फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
हेही वाचा >>> पत्नीच्या तक्रारीनंतर माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीवर गुन्हा दाखल
शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा
“निवडणूक बिनविरोध व्हायला हवी. ती महाराष्ट्राची परंपरा आहे. पूर्वी ती खंडित झाली होती. तेव्हा शरद पवार यांनी स्वत: पुढाकार घेऊन ती परंपरा पुन्हा सुरू केली होती. शरद पवार हे सर्वांचेच नेते आहेत. त्यामुळे यावेळीही ते ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतील, अशी मला खात्री आहे,” असे दीपक केसरकर म्हणाले.
हेही वाचा >>> “आमची चूक झाली, सत्यजीतला उमेदवारी द्यायला हवी होती,” अजित पवारांचे भर सभेत विधान!
विधान परिषदेच्या निकालामुळे हुरळून जाऊ नका
“विधान परिषदेच्या निकालामुळे हुरळून जाण्याची गरज नाही. कारण या निकालाचा अभ्यास मी स्वत: केला आहे. अमरावतीला आम्हाला धक्का बसला. तेथे साडेचार हजार मते बाद झाली. मराठवाड्यात आमच्या शिक्षण संस्था नाहीत. त्यामुळे औरंगाबादची जागा अनेक वर्षे राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे राहिलेली आहे. कोकणच्या जनतेने बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेलेल्या लोकांना धडा शिकवला. त्यामुळेच या जागेवर आमचा उमेदवार एकतर्फी निवडून आला. कोकणात शिवसेनेचे मूळ आहे,” असे दीपक केसरकर म्हणाले.