निजामकाळात ‘कुणबी’ अशी नोंद असलेल्या मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दाखले देण्याबाबत राज्य सरकारने गुरुवारी शासन निर्णय प्रसृत केल्यानंतरही आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देण्याच्या मागणीवर ठाम असल्याचे स्पष्ट करीत जरांगे यांनी उपोषण कायम ठेवल्याने मराठा आरक्षणाचा तिढा कायम आहे. दरम्यान, जालना येथे झालेल्या दगडफेक आणि लाठीमार प्रकरणी दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दीपक केसरकर म्हणाले की, “मराठा समाजाइतका प्रगल्भ समाज संपूर्ण भारतात नाही. लाखोंचे मोर्चे निघाले, परंतु एकही दगड उचलला गेला नाही ही वस्तूस्थिती आहे. उपोषणकर्त्यांच्या तब्येतीला काही होऊ नये म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करणे एवढ्यापुरती ती बाब मर्यादीत होती. त्यांना रात्रीच रुग्णालयात दाखल करू असं सांगण्यात आलं. त्यावर त्यांनी उद्या दुपारी रुग्णालयात दाखल होतं असं सांगितलं. दुसऱ्या दिवशी प्रशासनाचे अधिकारी मनोज जरांगे यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेले त्यावेळी मराठा समाजाने दगडफेक केली नाही, दुसऱ्या कुणीतरी तिथं येऊन दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला. म्हणजे हा काहीतरी कटही असण्याची शक्यता आहे.”
हेही वाचा >> मराठा आरक्षणाचा तिढा कायम; सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगेंची मागणी, उपोषण सुरूच
“२५ – ३० दगडफेक झाली की पोलिसांकडून लाठीमार होणार. पोलिसांकडून लाठीमार झाला म्हणून त्यांच्यावर कारवाईही करण्यात आली. यातही राजकारण करण्याचा प्रयत्न झाला, असंही केसरकर म्हणाले.
“आम्हाला जरांगे पाटलांच्या तब्येतीची काळजी आहे. हीच भावना होती, म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. त्यांची एक किडनी कमजोर आहे, त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तरुण वयापासून त्यांनी सामाजिक कार्य केले आहेत, अनेक आंदोलने केली आहेत, एक चांगला कार्यकर्ता आहे. त्यांच्या तब्येतीला काही होऊ नये हीच भावना आहे”, अंसही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.