राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या डाव्होस दौऱ्यात तब्बल ३५ ते ४० कोटींचा खर्च झाल्याचा आरोप माजी मंत्री तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला होता. तसेच मुख्यमंत्र्यांनी डाव्होस दौऱ्यात नेमके काय केलं? याचा तपशील जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली होती. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या आरोपाला दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरेंचे आरोप हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – डाव्होसमध्ये ७६ तासांत मुख्यमंत्री फक्त ४ तास झोपले? दीपक केसरकरांच्या दाव्याची चर्चा; म्हणाले…

नेमकं काय म्हणाले दीपक केसरकर?

आदित्य ठाकरेंना वयामुळे अनुभव नाही, हे आम्ही समजू शकतो. म्हणून रोज काही तरी बोलायचं आणि स्वत:चं हसं करून घ्यायचं, हे योग्य नाही. आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंशी बोलावं, खात्री करून घ्यावी. जगभरातील लोक डाव्होसमध्ये चार्टर्ड विमानानेच येतात. चार्टर्ड विमानाने प्रवास केला म्हणजे फार मोठा गुन्हा केला, असं होत नाही. यापूर्वी अनेक मुख्यमंत्र्यांनी चार्टर्ड विमानाने प्रवास केला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंचे आरोप हास्यास्पद आहेत, असं प्रत्युत्तर दीपक केसरकर यांनी दिलं. डाव्होस दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांचं कमर्शियल विमानाचं तिकीट बूक करण्यात आलं होतं. मात्र, लवकर पोहोचावं यासाठी ते चार्टर्ड विमानाने गेले. अशातच तांत्रिक कारणांमुळे त्यांना डाव्होस पोहोचण्यात उशीर झाला. डाव्हासमध्ये ३७ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प महाराष्ट्रात येणार होते. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी अनुपस्थित राहणं, हे योग्य नव्हतं. हा पंतप्रधानांचा अपमान ठरल असता, असंही ते म्हणाले.

हेही वाचा – विदर्भात गुंतवणूक करण्यासाठी डाव्होसमध्ये करार करणाऱ्या तीन कंपन्या महाराष्ट्रातीलच

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ७६ तास डाव्होसमध्ये होते आणि ते केवळ चार तास झोपले. ७२ तास त्यांनी वेगवेगळ्या लोकांशी चर्चा केली. त्यांना भेटायला अनेक देशांचे प्रमुख आले होते, त्यालासुद्धा हिनवण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरेंकडून करण्यात आला. यावरून महाराष्ट्राचं राजकारण किती खालच्या पातळीवर गेलं आहे, याचा विचार केला पाहिजे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. कोणतीही परदेशी गुंतवणूक जेव्हा भारतात येते, तेव्हा त्या कंपनीची भारतात नोंदणी करणे आवश्यक असते, एवढं साधं ज्ञानही त्यांना नसेल तर हे मुद्दे मांडायला ठाकरेंनी आता एखाद्या प्रवक्त्यांनी नेमणूक करायला हवी, असा टोलाही त्यांनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepak keserkar replied to aditya thackeray allegation on cm eknath shinde davos visit spb