विनायक मेटे यांच्या निधनानंतर अभिनेत्री दीपाली सय्यद भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या. “पनवेलसारख्या रुग्णालयात इंजेक्शन सापडत नाही, या गोष्टीचं दुःख आहे,” अशी भावना दीपाली सय्यद यांनी व्यक्त केली. तसेच विनायक मेटे यावेळी मंत्रिपदाचे दावेदार होते, त्यांनी इतकी वर्षे मराठा आरक्षणासाठी काम केलं आहे, असं म्हणत सय्यद यांनी सूचक वक्तव्य केलं. त्या मुंबईत माध्यमांशी बोलत होत्या.
दीपाली सय्यद म्हणाल्या, “अपघात सीसीटीव्हीत दिसतोय. नेमकं काय झालं हे शोधलं पाहिजे, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. मराठा आरक्षणाच्या लढ्यात अनेकांचे बळी गेले आहेत. त्यांना अचानक बोलवण्यात आलं. तुम्ही या असे आदेश दिले जातात. विनायक मेटे यावेळी मंत्रिपदाचे दावेदार होते. त्यांनी इतकी वर्षे मराठा आरक्षणासाठी काम केलं आहे. तिथून तुम्ही त्यांना आदेश देता.”
“महामार्गांवर रुग्णालयं, ट्रॉमा सेंटर का नाहीत?”
“महामार्गांवर रुग्णालयं, ट्रॉमा सेंटर का नाहीत? जिथं हॉटेल्स आहेत तिथं छोट मोठी रुग्णवाहिका उभी राहिली तर तात्काळ सेवा मिळेल. रस्त्यांवर गाड्या आहेत. अपघात होतात. मात्र, असे अनेक अपघात होतात. वेळेत उपचार झाले तर कदाचित काही होऊ शकतं. त्यांना पनवेलहून जे. जे. रुग्णालयात आणावं लागलं. आपण कुठे आहोत, काय करतो आहोत? या सर्व गोष्टींचं दुःख आहे,” असं दीपाली सय्यद यांनी सांगितलं.
“पनवेलसारख्या रुग्णालयात आज इंजेक्शन सापडत नाही”
“किमान आत्ताचं सरकारने लवकरात लवकर या गोष्टींकडे लक्ष द्यावं अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करते. पनवेलसारख्या रुग्णालयात आज इंजेक्शन सापडत नाही. या गोष्टीचं दुःख आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ही चौकशी लवकरात लवकर व्हावी. कारण अपघातानंतर तासभर तेथे कुणीही पोहचत नाही. पोलीस म्हणत होते मी नेरळवरून आलो आहे, मग पनवेलचे पोलीस तेथे का पोहचले नाही? का तासभर वेळ लागला. खोपोली पनवेल मार्गावर लगेच पोहचले पाहिजे होते,” असं म्हणत सय्यद यांनी नाराजी व्यक्त केली.