Deepali Sayed on Prajakta Mali : परभणीच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय. भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्याशी थेट अभिनेत्रींचा संबंध जोडल्याने मराठी कलाविश्वातून संताप व्यक्त केला जातोय. संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडेंचं नाव समोर आलेलं असताना आता मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीशीही त्यांचा संबंध जोडला गेल्याने मराठी कलाकारांनी सुरेश धस यांचा निषेध केला आहे. मराठी प्रसिद्ध अभिनेत्री आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनीही सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे. त्या टीव्ही ९ मराठीशी बोलत होत्या.
दीपाली सय्यद म्हणाल्या, संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांच्या न्यायासाठी सर्व पक्ष एकत्र आले होते. यामुळे संतोष देशमुख यांना न्याय मिळेल अशी आशा जागा झाली.”
हेही वाचा >> Sushma Andhare : “प्राजक्ता माळी RSS च्या मुख्यालयात जातात तेव्हाच…”, सुषमा अंधारेंचं विधान चर्चेत!
“काल मी प्राजक्ताची पूर्ण पत्रकार परिषद पाहिली. प्राजक्ताला रडताना पाहिलं तेव्हा वाईट वाटलं. कारण तिने रडलं नव्हतं पाहिजे. ती महाराष्ट्राची आवडती कलाकार आहे. तुला तुझं मत मांडण्याचा पूर्ण हक्क आहे. करुणा धनंजय मुंडेने जेव्हा तिचं नाव घेतलेलं तेव्हाच तिने तिचं मत मांडायला हवं होतं. तिला ठासून विचारायला पाहिजे होतं की मी काय असं केलंय की तुम्ही माझं नाव घेताय? करुणा मुंडे ही धनंजय मुंडे यांची पत्नी आहे. याप्ररकरणात सुरेश धस चुकीचे आहेत. सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्यासाठी लढा उभारला. पण आता कलाकारांची नावं घेणं चुकीचं आहे. याचा अर्थ तुम्ही सर्व कलाकारांना एकत्र आणलं. त्यांनी प्राजक्ताची नव्हे तर सर्व कलाकारांची माफी मागितली पाहिजे”, असं दीपाली सय्यद म्हणाल्या.
“कलाकारांच्या नावामागे ग्लॅमर आहे, त्यामुळे तुम्ही त्यांची नावं घेता. कारण त्यांचं नाव घेतलं की ते माध्यमातही येतं. राजकीय नेतेच कला-क्रीडा महोत्सव करतात. मोठ मोठ्या कलाकारांना बोलावलं जातं. याचा अर्थ तुम्ही बोलताय हे सर्व कलाकार असेच आहेत का? अशा पद्धतीने कलाकारांचं नाव का घेता? नाहीतर तुम्ही पुरावा द्या”, असं आवाहनही त्यांनी केलं.