कराड : माजी पंतप्रधान, जगविख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. डॉ. सिंग यांनी त्यांच्या कालखंडात अनेक लोकाभिमुख कायदे केले. त्यामुळे त्यांचा पंतप्रधानपदाचा १० वर्षांचा कालखंड हा आधुनिक भारताचा सुवर्णकाळच म्हणावा लागेल, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधानानंतर त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात पंतप्रधान कार्यालयाचे माजी राज्यमंत्री म्हणून काम केलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.
हेही वाचा >>> Video: मनमोहन सिंग यांच्या निधनावर अण्णा हजारे यांनी व्यक्त केला शोक; म्हणाले, “काही लोक…”
डॉ. मनमोहन सिंग यांच्यासोबत मी पंतप्रधान कार्यालयाचा मंत्री म्हणून सहा वर्षे अत्यंत जवळून काम केले आहे. डॉ. सिंग हे अत्यंत उच्चशिक्षित तसेच प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ होते. पण, त्याचा त्यांना कधीही गर्व नव्हता. ते राजकारण चांगल्या पद्धतीने समजत होते. परंतु, ते राजकारणी नव्हते, असे म्हटले जाते. कारण ते परंपरागत मंत्री, पंतप्रधान असे नव्हते. त्यांच्याकडे प्रचंड नम्रता होती, हे मी अगदी जवळून पाहिले.
डॉ. सिंग यांची सन २००८ च्या जागतिक मंदीत पंतप्रधान म्हणून भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली, त्यांच्या आर्थिक धोरणामुळे त्या आर्थिक मंदीची त्यांनी भारताला झळ बसू दिली नसल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. डॉ. मनमोहन सिंग यांनी अनेक कायदे निर्माण केले. मनरेगासारखा कामाच्या अधिकाराचा कायदा, माहितीच्या अधिकाराचा कायदा, खाद्यान्न सुरक्षेचा कायदा, भूमी अधिग्रहण कायदा, शिक्षण हक्काचा कायदा, वनाधिकार कायदा असे अनेक लोकाभिमुख कायदे डॉ. सिंग यांच्या कालखंडात त्यांनी केले. त्यामुळे त्यांच्या पंतप्रधान कार्यकाळातील तो १० वर्षांचा कालखंड आधुनिक भारताचा सुवर्णकाळच म्हणावा लागेल, असे चव्हाण यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.