कराड : पुण्याच्या खडकवासला परिसरातील बिबट्याच्या शिकारप्रकरणी वन विभागाने कराड शेजारील ओगलेवाडी-हजारमाची येथे संशयिताच्या घरावर टाकलेल्या छाप्यात बिबट्याचे कातडे, गवा, भेकर, हरिण यांची शिंगे यासह अन्य साहित्य मिळून आले.
पुण्याच्या भांबुर्डीचे वनक्षेत्रपाल प्रदीप संपकाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली. अभिजित जाधव व विश्वजित जाधव यांच्या घरावर टाकलेल्या छाप्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. बिबट्याचे कातडे, गवा, भेकर, हरिण यांची शिंगे हे वन्यजीव अवयव तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
हेही वाचा – “…तर पळून जाऊन लग्न करा”, जयंत पाटलांचा प्रकाश आंबेडकरांना टोला
पुण्याच्या खडकवासला धरणालगतच्या मांडवी बुद्रुक येथील फार्म हाऊसमध्ये बिबट्याचे अवयव लपवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यावर वन विभागाच्या छाप्यात बिबट्याच्या नख्या, पंजे असे अवयव हस्तगत करण्यात आले होते.
या प्रकरणी विश्वजित जाधव आणि अभिजीत जाधव ( दोघेही सध्या रा. डेक्कन जिमखाना, पुणे) यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांचे मुळगाव ओगलेवाडी- हजारमाची (ता. कराड) हे असल्याने वनक्षेत्रपाल प्रदीप संकपाळ यांच्या पथकाने येथील जाधव यांच्या घरावर छापा मारला असता बिबट्याचे कातडे, गवा, भेकर, हरिण यांची शिंगे यासह अन्य संशयित साहित्य मिळून आले. मिळून आलेल्या वन्यप्राण्यांच्या अवयवांचा विचार करता बिबट्या, गवा, भेकर, हरिण यांची शिकार झाल्याचे स्पष्ट होत आहे. तर, वन्यप्राण्यांच्या शिकारीचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.