तालुक्यातील बहिरोबावाडी येथे गर्भवती असलेल्या हरिणीचा चार कुत्र्यांनी पाठलाग करून तिच्यावर हल्ला केला. तरुणांनी पाठलाग करून या हरिणीचे प्राण वाचवले. मात्र वन विभागाला कळवूनही त्यांनी या हरिणीला साधे ताब्यात घेण्याचेही सौजन्य दाखवले नाही. अखेर या तरुणांनीच जखमी अवस्थेत हरिणीला वन विभागाच्या कार्यालयात आणून सोडले.
रविवारी सकाळी पाण्याच्या शोधात ही गर्भवती हरिणी जंगलाच्या बाहेर आली. परिसरातील शिकारी कुत्र्यांच्या ती नजरेस पडताच त्यांनी हे सावज हेरले. त्यांना पाहून ही हरिणीही सैरावैरा पळू लागली. मात्र गर्भारपणामुळे तिला नीटसे पळताही येत नव्हते. त्याचाच फायदा घेऊन शिकारी कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. विठ्ठल लाळगे यांनी ते पाहिले. अन्य लोकांना मदतीला घेऊन तेही त्याचा पाठलाग करू लागले. भाऊसाहेब तोरडमल, बापू तोरडमल, प्रकाश वांगणे, रवि तोरडमल, किरण फाळके, कुलदीप लाळगे, मनोहर तोरडमल आदींनी मोठय़ा कष्टाने या शिकारी कुत्र्यांना पिटाळून लावत या हरिणीची त्यांच्या तावडीतून सुटका केली.  
या सर्वानी वन विभागाच्या वनक्षेत्रपालाला ही घटना कळवली, मात्र ते तर नाहीच, पण अन्य कोणी कर्मचारीही इकडे फिरकले नाहीत. अखेर या तरुणांनीच गाडी करून या जखमी हरिणीला वन विभागाच्या कार्यालयात नेऊन सोडले. येथेही त्या वेळी सगळी गैरव्यवस्थाच होती. मात्र हरिणीवर उपचार करून तिला जंगलात सोडू देऊ असे वनरक्षक डी. बी. तोरडमल व वनमजूर ए. एन. काकडे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा