सांप्रदायिकता आणि झुंडशाहीचे आव्हान मोडून काढण्यासाठी महायुतीचा पराभव करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
सातारा लोकसभा मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सकाळी शेकडो समर्थक आणि वाद्यांच्या निनादात मिरवणुकीने अर्ज दाखल केला. तालिम संघावर या मिरवणुकीचे सभेमध्ये रूपांतर झाले. या वेळी वरील दोन्ही नेत्यांनी हे आवाहन केले. या वेळी पालकमंत्री शशिकांत िशदे, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ. विक्रमसिंह पाटणकर, आ. प्रभाकर घाग्रे, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, तसेच खा. भोसले यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले उपस्थित होत्या.
पवार म्हणाले, आजपर्यंत अनेक निवडणुका मी पाहिल्या, त्यात भाग घेतला आहे. पक्षाची ध्येय धोरणे मतदारांसमोर ठेवून मते मागितली जातात. मात्र, सध्या भारतीय जनता पक्षाने नव्यानेच व्यक्तीला पंतप्रधानपद घोषित करून निवडणुका लढवण्याचे ठरवले आहे. भारतात लोकशाही आहे. निवडून आलेले खासदार पंतप्रधान ठरवत असतात याचा विसर त्यांना पडलेला आहे. त्यातून जो पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे त्याला भारताचा इतिहास माहीत नाही, अशी टीका मोदींचे नाव न घेता त्यांनी केली.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी आणि मोदींचा पक्ष म्हणजे केवळ झुंडशाही आहे. ही झुंडशाही देशाच्या एकात्मतेला धोकादायक आहे. काँग्रेसने सर्वधर्म समभावाचे तत्त्व पाळले आहे. शशिकांत िशदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मनोगत व्यक्त केले तर खा. भोसले यांनी आभार मानले.
झुंडशाही मोडण्यासाठी महायुतीचा पराभव करा
सांप्रदायिकता आणि झुंडशाहीचे आव्हान मोडून काढण्यासाठी महायुतीचा पराभव करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
First published on: 25-03-2014 at 04:18 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Defeat allience for finish ochlocracy