महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीचा झालेला पराभव हा देशातील काँग्रेस विरोधातील संतापाचा आणि सोशल मीडियावरून नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा परिणाम असल्याचे मत राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी व्यक्त केले. लोकसभा निकालानंतर सांगलीत आल्यानंतर त्यांची भेट घेतली असता त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. जनतेने दिलेला कौल आमच्या विरोधी असला तरी तो आम्ही मान्य करतो आणि आदरही करतो असे सांगितले.
गृहमंत्री पाटील म्हणाले, की आघाडी शासनाने जनतेने निवडून दिलेल्या दहा वर्षांच्या काळात अनेक जनहिताचे निर्णय घेतले आहेत. याचबरोबर सार्वजनिक जीवनात भ्रष्टाचार करणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली आहे. मात्र याची जाहिरात करण्यात आम्ही कमी पडलो आहोत. विकासाची काही कामे राहिली आहेत. त्याचबरोबर काही चुकाही झाल्या आहेत. या चुकांची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला जाईल. या पुढच्या काळात मतदारसंघातील पाण्याचा, उद्योगाचा, प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य दिले जाईल.
एखाद्या निवडणुकीत पराभव झाला म्हणून दादा घराणे संपले असा अर्थ कोणी घेऊ नये. दादा घराणे एखाद्या पराभवाने संपणार नाही व खचूनही जाणार नाही. दादांचे विचार अद्याप जिवंत आहेत. प्रतीक पाटील पुन्हा नव्याने कामाला लागतील आणि सांगलीकर पुन्हा त्यांना संधी देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लोकसभा आणि विधानसभा यांची परिस्थिती वेगळी असल्याने या निकालावर विधानसभेचे गणित मांडणे चुकीचे ठरेल असेही पाटील म्हणाले.

Story img Loader