पुणे, नागपूर, मुंबई, नाशिक, रत्नागिरी : ‘हर घर तिरंगा’ मोहिमेसाठी राज्यात बहुतांश जिल्ह्यांत वितरणासाठी आलेले लाखो राष्ट्रध्वज संहितेनुसार तयार झाले नसल्याचे लक्षात आल्याने हे झेंडे पुन्हा पाठविण्यात येणार आहेत. आता दोन ते तीन दिवसांत लाखो ध्वजांची जुळवणी कशी करायची हा प्रश्न जिल्हा यंत्रणांना पडला आहे.

 पुणे शहरात वितरण करण्यासाठी मागविण्यात आलेल्या पाच लाख झेंडय़ांपैकी चार लाख झेंडे निकृष्ट असल्याने ते परत पाठविण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली आहे. दरम्यान, येत्या दोन ते तीन दिवसांत नव्याने झेंडे उपलब्ध होतील, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. पुणे महापालिका पाच लाख झेंडय़ांची खरेदी करणार आहे. खरेदी केलेल्या झेंडय़ांचे नागरिकांना विनामूल्य वाटप केले जाणार आहे. त्यासाठी ८५ लाख रुपयांच्या खर्चालाही मान्यात देण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेने मागणी केल्याप्रमाणे एक लाख ९७ हजार झेंडे उपलब्ध झाले. त्यापैकी सत्तर हजार झेंडे योग्य नसल्याने ते विभागीय आयुक्त कार्यालयाकडे परत पाठवले आहेत. सांगली शहरासाठी आलेल्या एकूण राष्ट्रध्वजांपैकी ५० टक्के ध्वज सदोष असल्याचे आढळून आल्याने महापालिकेने पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला परत केले. महापालिका क्षेत्रात वाटपासाठी एक लाख राष्ट्रध्वजाची मागणी एका ठेकेदाराला दिली आहे. यापैकी पुरवण्यात आलेल्या ४४ हजार ७०० ध्वजांपैकी २५ हजार ध्वज सदोष आढळल्याने नाकारण्यात आले आहेत.

कोल्हापुरातही लाखांहून अधिक ध्वज वापरण्यास अयोग्य आढळल्याने ते परत पाठवण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ९ लाख ३७ हजार राष्ट्रध्वजांची गरज आहे. यापैकी कोल्हापूर जिल्हा परिषदेस शासकीय यंत्रणेकडून पाच लाख ध्वज उपलब्ध झाले आहेत. विदर्भात एक लाखांवर झेंडय़ाचा दर्जा निम्न स्वरूपाचा आहे.

एकटय़ा नागपूर महापालिकेने ४३ हजार, अकोला महापालिकेने ३५ हजार तर अमरावती महापालिककेने १० हजारांवर झेंडे त्याचा दर्जा योग्य नसल्याने परत पाठवले. चंद्रपूर महापालिकेला दोनही टप्प्यात प्राप्त झालेले ८० टक्के झेंडय़ाचा दर्जा योग्य नसल्याने परत पाठवण्यात आले.

नाशिक आणि मालेगाव महापालिकेला प्राप्त झालेले निम्म्याहून अधिक राष्ट्रध्वज सदोष असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ऐनवेळी पर्यायी व्यवस्था म्हणून नाशिक महापालिका नव्याने एक ते दीड लाख चांगल्या प्रतीचे राष्ट्रध्वज खरेदी करणार आहे.

  रत्नागिरी जिल्ह्यात वाटप झालेल्या तिरंगी झेंडय़ांपैकी सदोष झेंडे संबंधित संस्था किंवा शासकीय कार्यालयाला परत करण्याची सूचना प्रशासनाने केली आहे. रायगड जिल्ह्यातही हाच प्रकार आहे.

वापराआधीच धागे बाहेर..

 या ध्वजांसाठी हलक्या प्रतीचे कापड वापरण्यात आले आहे. या ध्वजांच्या एकाच बाजूला शिलाई करण्यात आली असून दुसऱ्या बाजूला अयोग्यरीत्या कापले आहे.  त्यामुळे ध्वजाचे धागे निघत असल्याचे आढळून आले.

दोष कोणते?

डाग पडलेले, अशोकचक्र अयोग्य ठिकाणी , आकारात चूक, कापड अस्वच्छ , रंगांची भेसळ, तीन रंगांच्या आकारात असमानता,  रंग फिके तसेच अशोक चक्राचा निळा रंग पसरलेला आदी दोष या राष्ट्रध्वजांमध्ये आढळून आले आहेत.