महापालिकेत आज आयोजित सर्वसाधारण सभा माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांना शोकसभेने श्रध्दांजली वाहून तहकूब करण्यात आली. नगरसेवकांनी केलेल्या मागणीवरून तहकूब सभा २० मार्च रोजी घेण्याचे महापौर तृप्ती माळवी यांनी जाहीर केले. सभा तहकुबीमुळे महापौरांना राजीनामा प्रकरणापासून तुर्तास दिलास मिळाला आहे.
    महापौर तृप्ती माळवी यांनी आज महापालिकेत विशेष सभेचे आयोजन केले होते. तसेच यानंतर सर्वसाधारण सभा होणार होती. सर्वसाधारण सभेत महापौर तृप्ती माळवी यांचे महापालिका सदस्यपद रद्द करावे, असा ठराव विषय पत्रिकेवर होता. त्यामुळे सभेविषयी उत्सुकता होती. नेहमी सभेला बारा वाजल्यानंतर हजर असणारे नगरसेवक आज वेळत हजर होते. सभेच्या सुरुवातीला नगरसेवक सत्यजित कदम व दिगंबर फराकटे यांनी माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांना श्रध्दांजली वाहून सभा तहकूब करण्याचा ठरव मांडला. यानुसार शोक सभा झाली.
    संभाजी जाधव म्हणाले, सदाशिवराव मंडलिक यांनी जिल्हय़ाच्या विकासात भरीव काम केले आहे. या कामाचा देशात नावलौकिक आहे. पाटबंधारे राज्यमंत्री असताना त्यांनी काळम्मावाडी धरणाच्या कामाला गती दिली. आज जिल्हय़ात घडलेली हरितक्रांती हे त्यांच्या कार्यामुळे शक्य झाले. आर. डी. पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेपासून मंडलिकांनी आपल्या राजकीय कार्यास सुरुवात केली. जनतेशी घट्ट नाळ त्यांनी जोडली होती. माळरानावर हमीदवाडा कारखाना उभारून शेतकऱ्यांचा आíथक विकास साधला. टोलच्या आंदोलनात रस्त्यावर उतरून आंदोलकांना मार्गदर्शन केले.
    राजेश लाटकर म्हणाले, शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा वसा घेऊन मंडलिकांनी आयुष्यभर काम केले. दिल्लीत संसदेच्या प्रांगणात शाहू महाराजांचा पुतळा उभारावा म्हणून मंडलिकांचा पुढाकार होता. कोल्हापुरातील टोल विरोधी आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी नेटाने केले.
    जयंत पाटील म्हणाले, जिल्हय़ातील विविध सामाजिक आंदोलनाचे मंडलिकांनी नेतृत्व केले. वाडी-वस्ती व डोंगराळ भागातील मुलींना शिक्षण मिळावे म्हणून शिक्षण संस्था उभारली. ऊसदाराची कोंडी फोडून एफआरपीपेक्षा जास्त दरही देण्याचे धाडस त्यांनी दाखविले. त्यांचे हे सामाजिक कार्य आपल्याला मार्गदर्शक आहे.
    आदिल फरास म्हणाले, सामान्य माणूस राजकीय व सामाजिक जीवनात काम करून मोठा होतो, याचे मंडलिक हे उदाहरण आहे. त्यांनी कोणालाही क्षणिक वाटावे म्हणून काम केले नाही, तर जे वास्तव आहे त्याच्याशी प्रामाणिक राहून काम केले. यावेळी उपमहापौर मोहन गोंजारी, निशिकांत बनच्छोड, लिला धुमाळ यांचीही भाषणे झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा