पूर्ती उद्योग समूहाच्या माध्यमातून काही प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांनी माझ्याविरोधात जे षड्यंत्र रचले, त्या अधिकाऱ्यांची नावे माहीत आहेत. २०१४ च्या निवडणुकीनंतर भाजप सत्तेत येईल, तेव्हा या अधिकाऱ्यांना काँग्रेस, सोनिया किंवा अर्थमंत्री वाचवू शकणार नाहीत, अशा शब्दांत भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी गुरुवारी प्राप्तिकर अधिकाऱ्यांना गर्भित धमकी दिली.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर गुरुवारी सकाळी त्यांचे नागपूरला आगमन झाले. त्यानंतर कार्यकर्त्यांशी बोलताना गडकरींनी प्रसारमाध्यमे आणि प्राप्तिकर खात्यावर आगपाखड केली. ते म्हणाले, ‘पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करताना पूर्ती उद्योग समूहाच्या कामातून मी स्वत:ला दूर ठेवले होते, मात्र काँग्रेस नेत्यांनी काही इंग्रजी आणि हिंदी प्रसारमाध्यमांना हाताशी धरून माझ्याविरुद्ध षड्यंत्र रचले. पूर्ती उद्योग समूहावरून माझ्यावर आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. खरे तर ज्या वेळी हे आरोप सुरू केले त्याच वेळी मी चौकशीसाठी तयार होतो, पण मधल्या काळात कुठलीही चौकशी सरकारने केली नाही आणि ऐन निवडणुकीच्या आदल्या दिवशी काँग्रेस पक्षातील काही नेत्यांच्या सूचनेवरून प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी पूर्ती उद्योग समूहावर छापे टाकले.’छापे टाकूनही प्राप्तिकर अधिकाऱ्यांच्या हाती काही लागले नसले तरी मला बदनाम करण्यासाठी माझ्याविरुद्ध करण्यात आलेले षड्यंत्र होते. ज्या प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांनी हे षड्यंत्र रचले त्यांची नावे मला माहीत आहेत. २०१४ च्या निवडणुकीमध्ये भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळ्या दगडावरची रेघ असून यामुळे त्या वेळी या सर्व प्राप्तिकर अधिकाऱ्यांना आणि ज्या नेत्यांनी माझ्याविरुद्ध हे षड्यंत्र रचले आहे अशा सर्वाना सडेतोड उत्तर देईल. त्या वेळी त्यांना सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अर्थमंत्री चिदंबरम कुणालाही पाठीशी घालू शकणार नाहीत, असा इशारा गडकरी यांनी दिला. इंग्रजी प्रसार माध्यमांनी ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली गेल्या काही दिवसांपासून माझ्याविरोधात अपप्रचार केला असून त्यांना योग्य वेळी उत्तर देऊ. या सर्व प्रकरणांत खरेच मी दोषी असेल तर दिवसभर ब्रेकिंग न्यूज दाखवण्यास माझी काहीच हरकत नाही, मात्र माझा कुठेच काही संबंध नसताना माझ्याविरोधातील बातम्या दाखवून मला बदनाम करण्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. असेही ते म्हणाले.
सोनिया मालकीण, बाकी नोकर
काँग्रेस ‘ब्लॅक मेलिंग’चे राजकारण करीत आहे. काँग्रेसमध्ये घराणेशाही असून सोनिया गांधी पक्षाच्या मालकीण असून यांचा मुलगा राहुल ‘मालक’ आहे आणि उर्वरित सर्व नोकर आहेत, अशा शब्दांत गडकरी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.