सांगली: जादा परताव्याचे आमिष दाखवून एका निवृत्त शिक्षकाला सुमारे दीड कोटींचा गंडा घालण्याचा प्रकार सांगलीत घडला असून या प्रकरणी तक्रारीनंतर सहा जणाविरूध्द विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, ओळखीचा फायदा घेत निवृत्त शिक्षक अयुब मिरजे यांचा विश्वास संपादन करून जादा परताव्याचे आमिष दाखविण्यात आले. आरसेंच्युअर कंपनीच्या पुण्यातील आर्मस इंटरनॅशनल या कंपनीत पैसे गुंतविले तर कमी वेळेत अधिक परतावा मिळेल असा विश्वास सहा जणांनी दिला. विश्वासाने मिरजे यांनी या कंपनीमध्ये 21 २१ मे ते १८ डिसेंबर २०२२ या कालावधीत २ कोटी १४ लाख ८७ हजार २०० रूपयांची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीवर मिरजे यांना ६७ लाख ५९ हजार ६४८ रूपयांचा परतावाही देण्यात आला. मात्र, त्यानंतर परतावा मिळाला नाही. वारंवार मुद्दल मागणी केली असता टाळाटाळ करण्यात आली. यामुळे १ कोटी ४६ लाख ७६ हजार ९०२ रूपयांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार मिरजे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात मंगळवारी दाखल केली.
हेही वाचा… “…तर लगेच मराठा आरक्षणाची घोषणा होईल अन् ब्रेकिंग न्यूज येईल”, मनोज जरांगेंचं सूचक विधान
या प्रकरणी नरेश जोशी (सांगली), राहूल चव्हाण (मिरज), सौरभ शर्मा (जयपूर, राजस्थान), राजेंद्र खांडेकर (इंदोर मध्यप्रदेश) जमीर अली (जयपूर) आणि अजित पाटील (मिरज) अशा सहा जणाविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.