सुहास सरदेशमुख, लोकसत्ता
औरंगाबाद : देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यावरून भाजपमध्ये निर्माण झालेल्या गोंधळामुळे भास्करराव खतगावकर पाटील यांनी पक्ष सोडला आणि त्यांच्या घरवापसीनंतर निवडणुकीची चर्चा रंगली.
नाराज खतगावकरांमुळे काँग्रेसला मतदानाची गणिते नव्याने जुळवून आणता येतील की नाही, या प्रश्नाचे उत्तर निवडणुकीनंतर मिळेल खरे, पण पोटनिवडणुकीची प्रतिष्ठा भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा एकदा नव्याने अटीतटीवर आणली आहे.
रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर जितेश अंतापूरकर यांना सहानुभूती मिळेल, असा काँग्रेसचा होरा होता; पण ही सहानुभूती निर्माण करण्यासाठी जातीचे गणित जुळवून आणता येते की नाही यावर निकाल अवलंबून राहतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. देगलूर विधानसभा मतदारसंघात लिंगायत आणि धनगर या दोन जातींचा प्रभाव अधिक आहे.
त्यामुळेच भाजपकडून कर्नाटकातील बीदर जिल्ह्य़ातील खासदार भगवंत खुबा यांनाही प्रचारात आणले. काँग्रेसकडून अशोक चव्हाणांनी ताकद लावल्यामुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे.
२०१४ मध्ये शिवसेना-भाजपची युती तुटल्यामुळे त्यानंतर सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली गेली. शिवसेनेच्या साबणे यांना तेव्हा खतगावकरांनीही मदत केली होती, असे सांगणारे कार्यकर्ते आहेत; पण निवडून आल्यानंतर खतगावकरांचा मानपान न राखल्याने साबणे आणि खतगावकरांमध्ये अंतर पडत गेले. आता सुभाष साबणेंना भाजपने उमेदवारी दिली आणि नाराज खतगावकरांनी भाजप सोडले. खतगावकरांचे काही समर्थक भाजपपासून दूर गेले असले तरी देगलूरमध्ये भाजपचे गणित जातीय समीकरणावर अवलंबून आहे.
मुखेड येथील विरुपाक्ष महाराजांना उमेदवारी दिली जाईल अशा हालचाली पहिल्या टप्प्यात घडून गेल्या; पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. विरुपाक्ष महाराजांचा लिंगायत समाजावर असणारा प्रभाव राजकीय पटलावर दिसेल, असे सांगितले जाते. तो राजीचा की नाराजीचा यावर निवडणुकांचे निकाल ठरू शकतील. असाच प्रभाव असणारा जातसमूह म्हणून धनगर समाजातील संख्या असल्याने भाजपने गोपीचंद पडळकर यांचेही दौरे या भागात घडवून आणले. निवडणुकीतील रणनीती ठरविण्यासाठी भाजपने नवनव्या पद्धतीने ताकद लावून केंद्रीय राज्यमंत्री यांचे दौरे झाले. त्यात रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड या सर्वाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल.
निवडणुका आल्या की, सर्व शक्ती पणाला लावायची भाजपची कार्यशैली यशस्वी होईल की, जितेश रावसाहेब अंतापूरकर यांना सहानुभूती मिळेल, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. काँग्रेसच्या नेत्यांनी ही निवडणूक तशी गांभीर्याने घेतली. नेत्यांनी म्हणण्यापेक्षाही सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी ते गांभीर्य वाढविले. त्यांना पुन्हा एकदा खतगावकर त्रास द्यायला उतरले आहेत. जुन्या संपर्काच्या आधारे निवडणूक यशस्वी करण्यासाठी सारे प्रयत्न सुरू झाले आहेत.
कोणतीही लाट किंवा नेत्यांचा प्रभाव नसणाऱ्या या निवडणुकीत लागणारे निकाल पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालाशीही जोडून पाहिले जातील. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी देगलूरला मुक्काम ठोकला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आयात केलेला उमेदवार यशस्वी ठरू शकतो का, हेदेखील निकालानंतर स्पष्ट होईल. १४ उमेदवार रिंगणात असल्याने कोण कोणाची मते ओढू शकतो, अशी गणिते सुरू झाली आहेत. अतिवृष्टीनंतर निर्माण झालेल्या समस्येतील ही निवडणूक भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.