कृष्णा पांचाळ

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोना व्हायरसची दहशत लक्षात घेऊन देहू येथील तुकाराम महाराज मंदिर २३ मार्चपर्यंत आणि आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊली मंदिर ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. इतक्या वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ही दोन्ही मंदिरं दर्शनासाठी बंद राहणार आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक प्रमुख मंदिरांनी मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये शिर्डीचं साईबाबा मंदिर, शनि शिंगणापूरचे शनि मंदिर, पालीचे बल्लाळेश्वर मंदिर, तुळजाभवानी मंदिर, त्र्यंबकेश्वर येथील शंकराचे मंदिर, मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिर, शेगावचे गजान महाराज मंदिर, अंबेजोगाई येथील अंबाबाई मंदिर ही मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत. यामध्ये आता देहू आणि आळंदी येथील मंदिरांचीही समावेश झाला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त करोना ग्रस्त असल्याने प्रशासन आणि स्थानिक पातळीवर अनेक निर्णय घेतले जात आहेत. त्याचमुळे आळंदी विश्वस्तांनी १८ मार्च ते ३१ मार्च दरम्यान ज्ञानेश्वर माऊलींचे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, इतिहासात पहिल्यांदाच माऊलीचे मंदिर बंद ठेवण्यात आलं असल्याचे विश्वस्तांनी लोकसत्ता ऑनलाईनला सांगितलं. २० मार्च ला एकादशी असून महाराष्ट्रातील वारकऱ्यांना आळंदीत न येण्याची विनंती करण्यात आली आहे. ३१ मार्चच्या आधी परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असं विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी माहिती दिली आहे.

पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात करोना ने थैमान घातले आहे. करोना बधितांचा आकडा १६ वर पोहचला असून सर्वोतोपरी प्रयत्न प्रशासन घेत आहे. मात्र, याला आता मंदिर विश्वस्त देखील पुढे आले असून आळंदी मधील माऊलींचे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यासाग निर्णय घेतला गेला आहे. करोनाचा प्रादुर्भाव हा गर्दी आणि इतर कारणांतून होतो. गर्दी टाळण्यासाठी निर्णय हा घेतला आहे असंही  ते म्हणाले. या दिवसांमध्ये नियमित असलेली पूजा दररोज पार पडेलच. अन्नछत्र, भक्त निवास हे देखील या दरम्यान बंद राहणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dehu and alandi temples remain closed till 31st march due to coronavirus scj 81 kjp