देहू: आळंदीत घडलेली घटना निषेधार्थ असून त्याचा मी निषेध करतो. पोलिसांनी वारकऱ्यांना संयमाने हाताळायला हवं होतं. वारकऱ्यांना आपुलकीने, प्रेमाने सांगितलं असतं तर असे मुद्दे उपस्थित झाले नसते. असं देहू संस्थांचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी म्हटलं आहे. प्रशासनाने आत्मचिंतन करावे असा सल्लादेखील त्यांनी दिला आहे.
आळंदीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याच्या वेळी मंदिराच्या दिशेने धावणाऱ्या तरुण वारकऱ्यांना पोलिसांनी काठीने अडवलं. त्यांच्यात झटापट झाली, काहींना हाताने धरून बाजूला करण्यात आलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून घटनेचा निषेध केला जातो आहे. यासंबंधी देहू संस्थांचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे. आळंदीत झालेला प्रकार हा निषेधार्थ आहे. पोलिसांनी वारकऱ्यांना हाताळताना संयम ठेवायला हवा होता. आपुलकीने, प्रेमाने सांगितल असतं तर असे मुद्दे उपस्थित झाले नसते. दोन्ही बाजूने विचार करण्याची गरज आहे. वारकरी हे शिस्तबद्ध आहेत ते कोणावरही आक्रमण करणार नाहीत. परंतु, अशा पद्धतीची वागणूक दिली तर त्यांना नक्कीच वाईट वाटेल. प्रशासनाने आत्मचिंतन करावं. अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घ्यावी. असे माणिक महाराज मोरे यांनी म्हटलं आहे.