सावंतवाडी : सिंधुदुर्ग चिपी विमानतळावर १ सप्टेंबरपासून नियमित विमानसेवा सुरू होईल असे प्रयत्न केल्यानंतर जाहीर करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई सिंधुदुर्ग विमानतळ सेवा पाहणाऱ्या एअरलाइनची स्थिती नाजूक असल्याचे सांगून नेहमीची सेवा सुरू राहण्याबाबत शंका व्यक्त केली आहे.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, मुंबई सिंधुदुर्ग विमानसेवा पाहणाऱ्या एअरलाइनची परिस्थिती कठीण आहे. सद्य:स्थितीत अकरापैकी केवळ सात विमाने सुरू आहेत त्यातील आता केवळ चारच विमाने सुरू राहिली आहेत. अजूनही एअरलाइनची परिस्थिती नाजूक बनत चालली आहे. चिपी विमानतळावरील सेवा सुरू राहण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह खासदार विनायक राऊत व आम्ही सर्व लोकप्रतिनिधी नियमित सेवा सुरू राहण्यासाठी प्रयत्न करत आहोत असे पालकमंत्री म्हणाले.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषद घेतली त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व मान्यवर उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, १ सप्टेंबरपासून मुंबई ते चिपी सिंधुदुर्ग विमानसेवा सुरळीत सुरू होणे गरजेचे होते त्यासाठी विमानतळ प्रश्नही बऱ्याच बैठका झाल्या पूर्वी उड्डाण योजनेमार्फत एअरलाइनची सेवा सुरू होती. ज्या कंपनीला हा ठेका दिला होता त्या एअरलाइन्स कंपनीचा ठेका ऑक्टोबपर्यंत आहे. मुंबई येथे चिपीसाठी एकच स्पॉट उपलब्ध आहे. सदर इतर कंपन्यांमार्फत वेगवेगळे रूट सुरू करण्याचा प्रयत्न आहे. या रूटवर खासगी पद्धतीने विमान घेतले तर साधारण १३ हजार रुपये एक प्रवासी भाडे बसेल ते सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नाही.
याउलट मोपा येथे तिकीट दर सर्वसामान्यांना परवडणारे आहे. त्यामुळे खासगी पद्धतीचा विचार करणे योग्य ठरत नाही. छोटय़ा विमानांच्या माध्यमातून जिल्ह्यात काही सेवा देता येईल का? याबाबत विचार सुरू आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत, असे सांगून सद्य:स्थितीत मुंबईची विमानसेवा नियमित सुरू होण्याची चिन्हे नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची सिंगल लेन सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. गौरी गणपती सणात लेन्स सुरू होईल. सिंधुदुर्गात येण्यासाठीचे अन्य पर्यायी मार्ग आहेत ते सुरक्षित असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.