लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलिबाग: रायगड जिल्ह्यात जल जीवन मिशनच्या कामांची संथगती सुरूच आहे. १ हजार ४२२ मंजूर योजनांपैकी केवळ ९५ कामेच पूर्ण झाली आहेत. तर १ हजार ३२७ गावे अद्यापही पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

केंद्रसरकारच्या माध्यमातून घरोघरी नळ पाणी पूरवठा यावा यासाठी जलजिवन मिशन अभियान राबविण्यात येत आहे. स्वच्छ आणि शुध्द मुबलक पाणी पुरवठा घरोघरी व्हावा हा या योजनेमागचा मूळ उद्देश आहे. प्रतिमाणसी किमान ५५ लिटर पाणी नागरीकांना उपलब्ध करून द्यायचे आहे. यासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. डिसेंबर अखेर या अभियानातील सर्व कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. पण ठेकेदारांची अकार्यक्षमता, तांत्रिक अडचणी, भ्रष्टाचाराचे आरोप आणि स्थानिक राजकारण या कारणामुळे योजने आंतर्गत मंजूर कामे रखडली असल्याचे दिसून येत आहे.

जल जिवन मिशन अभियान अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ हजार ४२२ पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आल्या असून, या योजनांपैकी ९५ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. तर ७४ योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. तर १ हजार २५३ कामे रखडली आहेत. ज्या योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करून योजना संबधित ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा-‘पंतप्रधान आवास’वर मर्जीतल्यांची वर्णी; राज्यात बोगस अभियंता, संगणक शिक्षिका आदींना पदे बहाल

ज्या ९५ गावातील पाणी पुरवठा योजना पूर्ण होऊन, घराघरात नळ कनेक्शन दिल्याने ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण थांबली आहे. यामुळे श्रम व वेळ वाचत असल्याची प्रतिक्रिया ग्रामीण भागातील महिला व्यक्त करीत आहेत. पण ज्या गावांची कामे रखडली आहेत. तेथील महिलांची पाण्यासाठी वणवण सूरूच आहे…

अकार्यक्षम ठेकेदारांवर कारवाईचा बडगा….

जल जीवन मिशन अंतर्गत कार्यारंभ आदेश देऊनही एक वर्षांचा कालावधी उलटूनही काम सुरू न करणाऱ्या ठेकेदारांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. १४ ठेकेदारांना एक वर्षांसाठी काळया यादीत टाकून, त्यांच्याकडून २६ कामे काढून घेण्यात आली आहेत. या २६ कामांची फेर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सुरू असलेल्या योजनांची काने गुणवत्ता पूर्वक पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून नियमित योजनानिहाय कामांची माहिती घेण्यात येत आहे. अधिकारी कामांना भेटी देऊन कामाची पाहणी करीत आहेत. निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

आणखी वाचा-अलिबाग: समुद्रातून वाहून येण्याऱ्या चरसचे दुष्परिणाम दिसण्यास सुरूवात, मुरुड येथे तरूण तरूणीला अटक

तालुकानिहाय पूर्ण झालेल्या योजना

रायगड जिल्ह्यात ९५ पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये अलिबाग ८, कर्जत ४, महाड ४, माणगाव ११, म्हसळा ६, मुरुड ७, पनवेल १, पेण ९, पोलादपूर १२, रोहा ८, श्रीवर्धन ११, सुधागड १०, तळा ३, उरण १ योजनांचा समावेश आहे.

जल जीवन मिशन अंतर्गत ९५ योजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, पुढील महिनाभरात ७४ योजनांची कामे पूर्ण होतील. सुरू असलेली पाणी पुरवठा योजनांची कामे गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या सूचना ठेकेदार अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक योजनेच्या कामाची माहिती वेळोवेळी घेण्यात येत आहे. योजनांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यात येत आहेत. -डॉ. भरत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delay in jaljeevan mission works in raigad mrj