मानव विकास मिशनअंतर्गत जिल्ह्यातील िहगोली, सेनगाव व औंढा नागनाथ तालुक्यांतील शाळांना सायकल खरेदीसाठी ५९ लाखांचा निधी देण्यात आला होता. मात्र अद्याप त्या खरेदी न झाल्यामुळे जूनअखेर सायकल खरेदी करा, नाहीतर निधी परत घेण्याचा इशारा शाळेच्या मुख्याध्यापकांना दिला आहे.
जिल्ह्यातील ३ तालुक्यांत मानव विकास निर्देशांक कमी असल्याने तो वाढविण्याच्या दृष्टीने मानव विकास मिशनअंतर्गत विविध योजना राबविल्या जातात. शैक्षणिक योजनांमध्ये विद्यार्थिनींचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी शाळेपासून ५ कि.मी.च्या आत राहणाऱ्या विद्यार्थिनींना सायकल देण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आला. परंतु सायकल कोणत्या कंपनीची खरेदी करावी, या वादात खरेदी अडकून पडली. पुढील आदेशापर्यंत खरेदी करू नये, अशाप्रकारच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या होत्या.
पूर्वी मुख्याध्यापकांकडून विद्यार्थिनींच्या याद्या मागवून प्रत्येक विद्यार्थिनीच्या खात्यावर २ हजार रुपये जमा करावेत व उर्वरित १ हजार रुपये सायकल खरेदी केल्यानंतर देण्यात यावेत, अशाप्रकारचा निर्णय झाला होता. त्यानुसार ३ तालुक्यांतील १ हजार ९०० विद्यार्थिनींची यादी देण्यात आली होती. त्या यादीनुसार शालेय व्यवस्थापन समितीकडे ५९ लाखांचा निधी २० मार्च रोजी वर्ग करण्यात आला होता.
विद्यार्थिनींच्या याद्या दिल्यानंतर निधी वर्ग करण्यात आला होता. ती प्रक्रिया पूर्ण करूनही खरेदी झाली नाही. त्यामुळे शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना २० जूनपर्यंत सायकल खरेदी न केल्यास तो निधी तात्काळ परत पाठवावा, अशा सूचना दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा