पिण्यास योग्य असल्याबद्दल पंचगंगा नदीतील पाण्याची तपासणी प्रयोगशाळेमार्फत करून घेण्यात यावी आणि नदीतील पाणी उपसा सुरू करावा असे आवाहन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी नगराध्यक्ष बिस्मिला मुजावर यांच्या अध्यक्षतेखाली गेलेल्या शिष्टमंडळाशी बोलताना केले.
पंचगंगा नदीमध्ये कोल्हापूर येथील जयंती नाल्यातून मलामिश्रित सांडपाणी मिसळल्यामुळे पाणी दूषित झाल्याच्या कारणावरून नदीतील पाण्याचा उपसा इचलकरंजी नगरपालिकेने बंद केला होता. परिणामी, फक्त कृष्णा नदीतून पाणीउपसा केला जात असल्याने तीन ते चार दिवसांतून एक वेळ पाणी मिळत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत होता. कडक उन्हाळय़ामध्येसुद्धा अपुरे व अनियमित पाणी मिळत असल्याने विशेषत: महिलावर्गातून मुबलक व नियमित पाणी देण्याची मागणी होत होती.
अशा पाश्र्वभूमीवर पंचगंगा नदीमध्ये किमान पंधरा दिवसांतून एकवेळ धरणातील मुबलक पाणी सोडावे आणि पंचगंगा नदीतून पाणी उपसा करण्यास परवानगी मिळावी या मागणीसाठी नगराध्यक्ष मुजावर यांच्या अध्यक्षतेखाली इचलकरंजी नगरपालिकेचे नगरसेवक-नगरसेविकांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी राजाराम माने यांना भेटले. त्या वेळी झालेल्या चच्रेमध्ये जिल्हाधिका-यांनी वरीलप्रमाणे आवाहन केले.
या वेळी शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव, माजी नगराध्यक्ष सुमन पोवार, रत्नप्रभा भागवत, गटनेते बाळासाहेब कलागते, भीमराव अतिग्रे, भाऊसाहेब आवळे, शशांक बावचकर, विठ्ठल चोपडे, शकुंतला मुळीक, सुजाता बोंगाळे, रेखा रजपुते, सुरेखा इंगवले, मीना बेडगे, सयाजी चव्हाण आदी उपस्थित होते. जिल्हाधिका-यांना भेटल्यानंतर सांगली येथील प्रयोगशाळेतून पंचगंगेचे पाणी तपासून घेऊन नजीकच्या दोन दिवसांत नदीतून पाणीउपसा सुरू करणार आहोत. ज्यामुळे दोन दिवसांतून एकवेळ नागरिकांना पुरेसे पाणी मिळेल अशी माहिती नगराध्यक्ष मुजावर यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा