दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांनी शिक्षण, आरोग्य क्षेत्रात विविध निर्णय येत व्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवून आणले. दिल्लीत केजरीवाल आणि त्यांच्या आप ( AAP – Aam Aadmi Party ) या पक्षाला यश मिळाले त्यामध्ये या निर्णायांचा खूप मोठा प्रभाव होता. याच प्रतिमेचा फायदा केजरीवाल यांना पंजबामध्येही झाला आणि पंजाबची निवडणुक आपने जिंकली. तेव्हा केजरीवाल यांच्या कार्यामुळे प्रभावित होत सोलापूरचा ( Solapur ) निलेश संगेपांगला या तरुणाने सोलापूर ते दिल्ली असा सायकलने प्रवास करत केजरीवाल यांना भेटण्याचा निर्णय घेतला. निलेश संगेपांग हा संगमेश्वर महाविद्यालयात बीएचे शिक्षण घेत आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निलेशने सोलापूरहून दिल्लीच्या दिशेने सायकल प्रवास सुरु केला. सायकलवर तिरंगा आणि आप पक्षाचा झेंडा लावत १३ दिवसात निलेशने दिल्ली गाठली. आपने महाराष्ट्रातही निवडणुका लढवाव्यात, केजरीवाल यांनी जे बदल-सुधारणा दिल्लीत केल्या त्या महाराष्ट्रातही कराव्यात अशी त्याने मागणी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याकडे केली.
विशेष म्हणजे दिल्लीत पोहचल्यावर या प्रवासाची तात्काळ दखल घेण्यात आली, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी निलेशला प्रतिसाद दिला. निलेशला मुख्यमंत्री केजरीवाल यांची भेट घेण्याची संधी मिळाली. आपले म्हणणे निलेशने केजरीवाल यांच्यापुढे ठेवले. आपनेही या भेटीबद्दल ट्वीट करत केजरीवाल यांच्या या अनोख्या चाहत्याला शुभेच्छा दिल्या.