Sanjay Raut On Delhi Election Result 2025 : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं आहे. त्यामुळे आता पुढील काही दिवसांत दिल्लीत भाजपाचं सरकार स्थापन होईल. भाजपाला ४८ आणि आम आदमी पक्षाला २२ जागा मिळाल्या आहे, तर काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसला आलेल्या अपयशाबाबत विरोधी पक्षातील काही नेते आपलं मत व्यक्त करताना जर काँग्रेस आणि ‘आप’ एकत्रित निवडणूक लढले असते तर वेगळं चित्र असतं असा दावा करत आहेत. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या पराभवानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी टीका केली होती. या सगळ्या घडामोडींवर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना एक मोठं विधान केलं आहे. “अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाने अण्णा हजारे किंवा काँग्रेसला आनंद झाला असेल तर याचं दु:ख वाटतंय”, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
“लोकशाहीमध्ये निवडणुका होत असतात, निवडणुकीत जय-पराजय होत असतात. मात्र, गेल्या १० वर्षांपासून निवडणुका लोकशाही पद्धतीने लढल्या जात नाहीत. निवडणुका सैतानी पद्धतीने लढल्या जात आहेत. आम्हाला जिंकायच आहे, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचा आहे. त्यासाठी मग साम, दाम, दंड, भेद अशा सर्व गोष्टींचा वापर केला जातो. मतदार याद्यांमधील घोटाळा महाराष्ट्रात पाहिला तोच आपल्याला दिल्लीत दिसतो आहे. उद्या बिहारमध्ये हेच दिसेल. असाच प्रकार हरियाणातही दिसला. पण आता या सर्वांचा बाऊ न करता पुढील लढाईसाठी विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
‘…तर दिल्लीचा निकाल वेगळा लागला असता’
“दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पक्ष एकत्र निवडणूक लढले असते तर आज निकाल वेगळा लागला असता हे आकड्यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे एकत्र यायचं की नाही? याबाबत सर्वांनी भूमिका घेणं गरजेचं आहे. अन्यथा जे सध्या सुरु आहे त्याला मान्यता दिली पाहिजे. मग त्यामधून लोकशाही टीकेल का? विरोधी पक्षांचा आवाज राहिल का? या गोष्टींचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
‘आप’च्या पराभवाने काँग्रेसला आनंद झाला असेल तर…’
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली होती. दरम्यान, यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, “अण्णा हजारे काय म्हणतात त्याला काही अर्थ राहिला नाही. ते अचानक जागे होतात. महाराष्ट्रात एवढा भ्रष्ट्राचार झाला, लोकशाहीवर हल्ले झाले तरीही अण्णा हजारे यांनी कधीही हालचाल केली नाही. मात्र, दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाने अण्णा हजारे यांना आनंद झाला. त्यांच्या चेहऱ्यावर मी काल आनंद पाहिला. हे लोकशाहीला मारक आहे. अरविंद केजरीवाल आणि अण्णा हजारे यांनी एक मोठं आंदोलन उभं केलं होतं. त्यामुळे अण्णा हजारे देशाला माहिती झाले. पण गेल्या १० वर्षांत देशात अनेक संकटे आली, देश लुटला जात आहे. अनेकांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले ते आज सर्व भाजपाबरोबर आहेत. मग अण्णा हजारे यांना त्याबाबत मत व्यक्त करावं असं वाटत नाही का? त्यामागचं रहस्य काय आहे? दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या पराभवाचा आनंद अण्णा हजारे किंवा काँग्रेसला झाला असेल तर याचं दु:ख वाटतं. कारण अरविंद केजरीवाल जरी निवडणूक हरले असले तरी भाजपा विजयी झालं आहे”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.