* महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील जंगले शिकारी टोळ्यांचे लक्ष्य
* संरक्षित वनक्षेत्रातच वाघांची मोठय़ा प्रमाणात शिकार
* ट्रॅफिक, डब्ल्यूडब्लूएफच्या अहवालाने वनक्षेत्र हादरले
भारतासह चीन, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंड या देशांमधील वाघांच्या अवयवांच्या तस्करीचा दिल्ली आंतरराष्ट्रीय अड्डा झाला असून महाराष्ट्रातील पेंच, ताडोबा या व्याघ्र प्रकल्पांनाही शिकारी टोळ्यांनी लक्ष्य केले असून, त्यांचे अवयव आंतरराष्ट्रीय वन्यजीव तस्करी टोळ्यांच्या माध्यमातून विकले जात असल्याच्या धक्कादायक अहवालाने पर्यावरण जगत हादरले आहे. कान्हा, कर्माझरी, पेंच, ताडोबा तसेच सुंदरबन आणि पश्चिम घाटातील जंगलक्षेत्रांना आता शिकारी टोळ्यांनी लक्ष्य केल्याची माहिती जागतिक पातळीवर व्याघ्र तस्करी प्रतिबंधाचे काम करणाऱ्या ट्रॅफिक आणि डब्लूडब्लूएफ या दोन संस्थांनी गेल्या आठवडय़ात सादर केलेल्या अहवालातून देण्यात आली आहे.
वाघांचे अस्तित्व शिल्लक असलेल्या आशियातील १३ देशांमध्ये शिकारी टोळ्यांचे जाळे विस्तारले असून यात चीन, भारत, मलेशिया तसेच इंडोनेशियाचा प्रामुख्याने समावेश आहे. वाघांची शिकार केल्यानंतर त्यांच्या विशेषत: कातडी आणि हाडे या अवयवांची आंतरराष्ट्रीय पातळीवर विक्री केली जाते. यासाठी मोजली जाणारी किंमत कोटय़वधींच्या घरात आहे. दिल्ली ही भारताची राजधानी आणि आशियातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने दिल्लीला या चार आशियन देशांमधील आंतरराष्ट्रीय शिकारी टोळ्यांनी वन्यजीव अवयवांच्या खरेदी-विक्रीचा प्रमुख अड्डा बनविला आहे. उत्तर प्रदेशातील रामनगर, मध्य प्रदेशातील बालाघाट आणि जबलपूर ही शहरे वन्यजिवांच्या अवयव वाहतुकीची केंद्रे झाली असून व्याघ्र प्रकल्पांपासून अत्यंत जवळ आहेत. रामनगर वनविभाग हा जगप्रसिद्ध जिम कॉर्बेटचे प्रवेशद्वार असल्याने येथून वन खात्यातील अधिकाऱ्यांच्या मदतीने वाघांच्या अवयवांची वाहतूक करणे नित्याचे झाले आहे. मध्य प्रदेशातील कान्हा आणि पेंच (कर्माझरी) तसेच महाराष्ट्राला लागून असलेल्या पेंच तसेच ताडोबा व्याघ्र प्रकल्पात असे प्रकार घडत आहेत. पश्चिम बंगालमधील कोलकाता तसेच सुंदरबनच्या दक्षिणेकडील जंगलक्षेत्रांमधून अशी अवैध वाहतूक केली जात आहे. पश्चिम घाटात येणारे सत्यमंगलम (तामिळनाडू) हे घनदाट जंगलही वनतस्करांनी सोडलेले नाही.
वाघ आणि बिबटय़ांची कातडी अलीकडच्या काळात मोठय़ा प्रमाणात जप्त करण्यात आली. यातील २६ टक्के जप्ती एकटय़ा दिल्लीतील आहे. यातूनच दिल्ली हा शिकारी टोळ्यांचा खरेदी-विक्रीचा प्रमुख अड्डा झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये विजेचा शॉक देऊन वाघांची शिकार करण्याचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्राचे भूषण असलेल्या ताडोबात दहापेक्षा जास्त वाघांची शिकार करण्यात आली. सुंदरबन आणि पश्चिम घाटातील जंगलांमध्ये वाघांची बेसुमार शिकार केली जात आहे. बांगलादेशी शिकाऱ्यांच्या टोळ्या यात मोठय़ा संख्येने सहभागी आहेत. एका शिकाऱ्याच्या घरून तीन वाघांची डोकी, चार कातडी आणि २४ किलो हाडे नुकतीच जप्त करण्यात आली. जिम कॉर्बेटचे जंगलही आता वाघांसाठी सुरक्षित राहिलेले नाही.
अहवालातील २०१०-२०१२च्या आकडेवारीनुसार गेल्या १३ वर्षांत १४०० पेक्षा जास्त वाघांचे अवयव जप्त करण्यात आले. आशियातील १३ देशांमध्ये १४२५ वाघांचे अवयव शिकाऱ्यांकडे सापडले आहेत. या तीन वर्षांच्या काळात थायलंडमध्ये ३० जिवंत वाघ ताब्यात घेण्यात आले. थायलंड, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या देशांमध्ये वाघ पाळणे हा राजेशाही शौक समजला जात असल्याने वाघांच्या बछडय़ांची मोठय़ा प्रमाणात तस्करी केली जात आहे. आशियात दरवर्षी किमान सरासरी ११० किंवा त्यापेक्षा जास्त वाघ मारले जात असून, त्यांची कातडी, हाडे, दात, लिंग, पंजे आणि मुंडक्यांना जगभरात मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. यातील ८९ टक्के शिकारी संरक्षित वनक्षेत्रातच करण्यात आल्या आहेत.
वाघांच्या तस्करीचा दिल्ली आंतरराष्ट्रीय अड्डा
भारतासह चीन, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंड या देशांमधील वाघांच्या अवयवांच्या तस्करीचा दिल्ली आंतरराष्ट्रीय अड्डा झाला असून महाराष्ट्रातील पेंच, ताडोबा या व्याघ्र प्रकल्पांनाही शिकारी टोळ्यांनी लक्ष्य केले असून, त्यांचे अवयव आंतरराष्ट्रीय वन्यजीव तस्करी टोळ्यांच्या माध्यमातून विकले जात असल्याच्या
First published on: 12-03-2013 at 04:41 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi is international spot of smuggling of tigers