गणेशोत्सवात मोठय़ा संख्येने कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी पनवेलपासून महामार्गाच्या चौपदरीकरण कामामुळे उडालेली दुर्दशा, वाहनचालकांमधील बेशिस्तीमुळे होणारी वाहनांची कोंडी, एखादा अपघात घडल्यास वाहनांचा होणारा खोळंबा या साऱ्या गोष्टी लक्षात घेता मुंबई-गोवा महामार्गापैकी रायगड जिल्ह्य़ातून जाणाऱ्या रस्त्याला पर्याय ठरू शकणाऱ्या अन्य रस्त्यांचा जिल्हा वाहतूक यंत्रणेने विचार करण्याची वेळ आली आहे.
 वडखळ-रामवाडी पेण-अंतोरे या रस्त्याची भयावह अवस्था पाहता या ४ कि.मी. प्रवासाला ४० मिनिटांचा कालावधी लागतो आहे, ही बाब लक्षात घेता गणेशोत्सवामध्ये हजारोंच्या संख्येने रस्त्यावर येणारी वाहने गृहीत धरल्यास वाहतूक व्यवस्थेची काय अवस्था होईल याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. रस्त्याची दैनावस्था दूर करण्याचे कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत.
यासाठीच गणेशोत्सव कालावधीमध्ये जिल्ह्य़ांतील पनवेल- खोपोली- पाली- खाळजे, विळे, निजामपूरमार्गे माणगाव या मार्गाचा त्याचप्रमाणे पनवेल-मोहपाडा, रसायनी, कालिवली, सावरोली, दुष्मीमार्गे खारपाडा जिथे येथे महामार्गाला मिळणारा रस्ता, पनवेल खोपोली पालीमार्गे वाकण येथे येणारा रस्ता, वडखळ, धरमतर, पोयनाड, पेझारी येथून आय.पी.सी.एल., रिलायन्स, बेणसे आयडोशी सुप्रीम पेट्रोकेममार्गे कोकण रस्ता या पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचा विचार होणे जरुरीचे झाले आहे. या विविध मार्गावरून वाहतूक फिरविल्यास रायगड जिल्ह्य़ातील वाहतुकीची होणारी कोंडी टाळून वाहतूक सुरळीत होण्यास निश्चित मदत होणार आहे. या सर्व मार्गापैकी पनवेल-खोपोली, पाली- विळे- निजामपूरमार्गे माणगाव येथे निघणारा रस्ता हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. पवन या मार्गावरील पाली गावातून जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक नियंत्रण  होणे गरजेचे ठरणार आहे. त्याचबरोबर या विविध मार्गावरून वाहतूक फिरविताना मार्गदर्शक फलक वा वाहतूक नियंत्रक पोलीस ठेवण्याची आवश्यकता आहे.
गणेशोत्सवामध्ये कोकणामध्ये जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुसह्य़ व्हावा, मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे-इंदापूर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण बऱ्याच प्रमाणात कमी होऊन वाहतुकीचे विकेंद्रीकरण व्हावे या दृष्टीने पर्यायी रस्त्यांचा विचार झाला पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा