वाई : महाबळेश्वरला येणारे पर्यटकांचे घाटातील धबधब्यांवर सुरू असलेले पर्यटन हे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पर्यटकांना धबधब्यावर थांबण्यास बंदी घालण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने महाबळेश्वरच्या तहसीलदार व पोलिसांकडे केली आहे.
मागील आठवडय़ापासून महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे घाटातील धबधबे ओसंडून वाहत आहेत. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. सध्या वर्षां सहलीसाठी आलेले पर्यटक हे आवर्जून घाटातील धबधब्यावर थांबून वर्षां सहलीचा आनंद लुटताना दिसत आहेत. परंतु मुसळधार पाऊस सुरू असताना असे पर्यटन हे धोकादाय ठरू शकते. मुसळधार पावसामुळे अनेक धबधब्यावरून पाण्याबरोबर दगड धोंडे खाली येत आहेत. हे दगड, धोंडे, झाडे, फांद्या, लाकडाचे तुकडे वाहत येत धबधब्यावर पावसात भिजत असलेल्या पर्यटकांच्या अंगावर पडून जिवावर बेतू शकतात. त्यामुळे या गंभीर पर्यटनाची येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली असून त्यांनी या पर्यटनाबाबत तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश गोंजारी यांनी तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांना याबाबत पत्र पाठवून त्यासोबत पर्यटक धबधब्यावर अंघोळ करत असल्याचे फोटो त्यांनी जोडले आहेत. अशा पर्यटनामुळे पर्यटकांच्या जिवाला धोका होऊ शकतो. काही दिवस अशा पर्यटनाबाबत गांभीर्याने विचार होऊन येथे थांबण्यास पर्यटकांना मनाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कुमार जाधव, वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी व पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांना देण्यात आल्या आहेत.