लोकसत्ता वार्ताहर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कराड : पश्चिम महाराष्ट्र व कोकणास जोडणारा आणि दीर्घकाळ रखडलेला कराड- चिपळूण रेल्वे प्रकल्प मार्गी लागल्यास शेती, उद्योग, पर्यटन, दळणवळणास चालना मिळेल. तरी त्यास मार्चमधील केंद्रीय अर्थसंकल्पात मंजुरी द्यावी, यासह अन्य मागण्या नागरिक व प्रवाशांतर्फे रेल्वे कृती समितीने ओगलेवाडी-कराड रेल्वे स्थानकात मध्य रेल्वेचे मंडळ वरिष्ठ प्रबंधक राजेशकुमार वर्मा यांच्याकडे निवेदनाने केल्या.

राजेशकुमार वर्मा वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत खास निरीक्षण रेल्वेने कोल्हापूर येथून ओगलेवाडी- कराड स्थानकावर आले. त्यांचे स्थानक प्रबंधक एन. जी. अलेक्झांडर, विभागीय सल्लागार समितीचे सदस्य गोपाल तिवारी यांनी स्वागत केले. वरिष्ठ परिचलन प्रबंधक रामदास भिसे, वाणिज्य प्रबंधक मिलिंद हिरवे, स्थानिक सहायक प्रमुख अमरीश कुमार, मालधक्का कामगार संघटनेचे किरण पवार, सुनील चव्हाण, हिम्मत मदने, रामदास जाधव, प्रवासी व नागरिक उपस्थित होते.

आणखी वाचा-HIV मुळे मुलीच्या मृत्यूची अफवा, गावकऱ्यांनी कुटुंबाला वाळीत टाकलं; बीडमधील धक्कादायक घटना, सुप्रिया सुळेंचा संताप

कराड-विटा महामार्गावरील जुना रेल्वे पूल धोक्याचा व अरुंद बनल्याने तिथे नवीन रेल्वे पूल बांधावा, यासह अन्य मागण्या प्रवासी व नागरिकांसह रेल्वे कृती समितीने वर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या. वर्मांनी अधिकाऱ्यांसमवेत स्थानकाचे प्रवेशद्वार, आरक्षण कार्यालय, वाहनतळ, प्रतीक्षालय आदींच्या नवीन कामांची पाहणी केली.

रेल्वे स्थानक ते गोवारे फाट्यापर्यंतच्या रस्त्याचे दुरुस्तीचे काम प्रलंबित आहे. तो प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा रस्ता आहे. तो त्वरित सिमेंट-काँक्रीटचा व्हावा, रेल्वे पुलाचे मजबुतीकरण व दोन्ही बाजूंस सेवा रस्त्याची गरज आहे. कोल्हापूर-पुणे लोहमार्गावर १३६ वर्षांपूर्वीचे हे महत्त्वाचे स्थानक आहे. दररोज २० रेल्वे गाड्यांची वाहतूक होते. ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकाचा मूळ ढाचा कायम ठेवून स्थानकाचा कायापालट करून आदर्श मॉडेल स्टेशन करावे, अशी मागणी तिवारी यांनी केली. स्थानकावरील मालधक्क्यावर काम करणाऱ्या कामगारांना विश्रांतीगृह, पाणी, वीज, स्वच्छतागृह, दुचाकी वाहनतळ व मालधक्क्यावर लोडिंगसाठी २१ वॅगनची सोय करण्याची मागणी मालधक्का कामगारांनी वर्मा यांच्याकडे केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand for budget approval for karad chiplun railway project mrj