सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर करावे, या मागणीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, शिवप्रतिष्ठान संघटनेने याप्रकरणी सांगलीच्या जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले. लवकरात लवकर या गावाचे नामांतर करावे, नाहीतर ईश्वरपूरमध्ये बंद पुकारला जाईल, असे शिवप्रतिष्ठान संघटनेचे नेते नितीन चौगुले यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना केला. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांनीही या मागणीचे समर्थन केले असून, १९८६ पासून नामांतराचा हा विषय प्रलंबित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे नामांतर करून एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्याचा निर्णय नवी दिल्ली महापालिकेने घेतला. या नामांतरानंतर महाराष्ट्रातही वेगवेगळ्या ठिकाणी नामांतराचे जुने विषय पुन्हा डोके वर काढू लागले आहेत. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. पक्षाकडून पुन्हा ही मागणी लावून धरण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता इस्लामपूर गावाचे नाव बदलून ईश्वरपूर करण्याची मागणी पुढे आली आहे.

Story img Loader