पीडित तरुणी आणि चित्रा वाघ यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्या मुलीने राज्य महिला आयोगाकडे केली आहे. शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका तरुणीने लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले आहेत. लग्नाचं अमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा तरुणीचा आरोप आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यावरुन टीका करत कुचित यांना जामीन देण्यात आल्याने संताप व्यक्त केला होता. या तरुणीवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचं चित्रा वाघ म्हटलं होतं. तरुणीने फेसबुकवर आपण स्वत:ला संपवत असल्याची पोस्ट केली असून ती मुलगी बेपत्ता आहे असा दावाही चित्रा वाघ यांनी केला होता. त्यानंतर आता कुचिक यांच्या मुलीने महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार केली आहे.
“रघुनाथ कुचिक यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये कुचिक यांना न्यायालयाने जामीन दिला आहे. संबधित फिर्यादी आणि चित्रा वाघ हे जाणीवपूर्वक आणि संगनमताने या प्रकरणाची मीडिया ट्रायल चालवत आहेत, अशी अर्जदाराने राज्य महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. अशा पद्धतीने आमची बदनामी होत आहे. म्हणून फिर्यादी आणि चित्रा वाघ यांच्यातील संगनमताची चौकशी व्हावी आणि त्यांची नार्को चाचणी करावी अशी मागणी अर्जदाराने केली आहे,” अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या तक्रारीची दखल घेऊन रुपाली चाकणकर यांनी पुणे पोलिसांना चौकशीचे आदेश आहे.
रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्कार आणि गर्भपाताचा आरोप करणाऱ्या तरुणीचा तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोगास काल प्राप्त झाला असून वरिष्ठ पोलीस निरिक्षक शिवाजी नगर पोलीस स्टेशन यांना याबाबत योग्य ती कार्यवाही करून याचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती महिला आयोगाने दिली आहे.
महाराष्ट्र पोलिसांनामध्ये आणू नका – रुपाली चाकणकर
“महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचं काम काही जणांकडून केला जात आहे. माझी विनंती आहे पोलिसांना मध्ये आणू नये. रघुनाथ कुचिक यांच्या मुलीने मेल केलेला आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असताना चित्रा वाघ या रघुनाथ कुचिक यांच्याबाबत जे वक्तव्य करत आहे, त्यामुळे आमच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचत आहे, असे त्यांच्या मुलीने म्हटले आहे. त्यामुळे खोटे आरोप करण्यापेक्षा सत्यता पडताळून पाहावी आणि उगाच आरोप करू नये. येत्या ३ ते ४ दिवसात दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल,” असं म्हणत चाकणकर यांनी वाघ यांच्यावर टीका केली.