कोकणचा पर्यटन, फलोद्यान व मत्स्य विकास साधण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात खास तरतूद करण्याची मागणी होत आहे. या तिन्ही पातीळय़ांवर कोकणाला मोठी देणगी लाभली आहे. त्याचा विकास नियोजन करून झाल्यास कोकण राज्यात आघाडीवर राहून आर्थिक क्षेत्रात प्रगती साधेल असे बागायतदार शेतकरी व उद्योजकांत बोलले जात आहे.
कोकणात पर्यटन विकास साधताना समुद्र, सह्य़ाद्रीचा डोंगर, पुरातन मंदिरे, बॅक वॉटर्स, थंड हवेची ठिकाणे, धबधबे, कृषी व साहसी पर्यटनांसह पर्यटनाच्या विविध आघाडय़ांवर नियोजन करण्याची गरज आहे. कोकणात सिमेंट काँक्रीटची जंगले उभारणारे पर्यटन नको तर कोकण पण राखून पर्यटन विकासासाठी अर्थसंकल्पात तरतूद व्हावी अशी मागणी आहे.
कोकणात पर्यटन उद्योग साधताना कृषी व सागरी पर्यटन महत्त्वाचे आहे. त्यासाठी तरतूद होणे महत्त्वाचे आहे. अ‍ॅग्रो टुरिझम, फिशरमन व्हिलेज, बंदरे हा एक पर्यटनाचा भाग बनू शकतो. त्याशिवाय गड, किल्ले व ऐतिहासिक वास्तू जतन करण्याची गरज आहे.
कोकणच्या विकासात पर्यटन, फलोद्यान व मस्यविकासाला फार महत्त्व आहे. त्याचे राज्य सरकारने नियोजन करून कोकणवर दृष्टिक्षेप टाकावा. कोकणपण टिकवत हा विकास महत्त्वाचा असल्याने अर्थसंकल्पात तुटपुंजी तरतूद नको. पर्यटनस्थळांना पायाभूत सुविधा निर्माण होण्याची गरज आहे.
समुद्रकिनारा किंवा डोंगरकपारीत जाणाऱ्या पर्यटकांना पायाभूत सुविधा निर्माण करणारी केंद्रे हवीत. विशेषत: स्वच्छतागृहांची फारच गरज आहे. समुद्रकिनाऱ्यावर जाणाऱ्या पर्यटकांना स्वच्छतागृहे नसल्याने फारच अडचणीचे बनत आहे.
सागरी मार्गावर पर्यटकांची प्रवासी सोय व्हावी म्हणून बंदराचा गाळ काढला जावा. हा गाळ काढून प्रवासी बोट सुरू झाल्यास गोवा राज्यात जाणारे देशी पर्यटक या भागातील स्वच्छ किनाऱ्यावर जाऊ शकतात. तशी सोय अर्थसंकल्पात करण्यात यावी अशी मागणी आहे.
पर्यटनांतर्गत समुद्र व कृषी पर्यटनाच्या अनेक पर्यायांना चालना देणे शक्य आहे. त्यासाठी खास तरतूद आवश्यक आहे.
कोकणचा कॅलिफोर्निया करण्याच्या अनेक घोषणा झाल्या पण त्यांना आकार दिला गेला नाही. राज्याचे मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी पर्यटन, फलोद्यानला चालना दिली. त्यानंतर आज फलोद्यान व पर्यटनाची यशोगाथा सांगितली जात आहे. काकांनी कोकणासाठी योगदान दिले आता पुतण्या उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी त्याला प्रत्यक्ष आर्थिक पाठबळ द्यायचे आहे.
फलोद्यान योजनेमुळे कोकणात बागायतदारांनी मोठा फायदा घेतला. आज लहान-मोठे प्रक्रिया उद्योग साकारले आहेत. कोकणात अन्य प्रक्रिया उद्योगांतर्गत फुड पार्क उभे राहण्याची गरज आहे. आत शीतगृहे नसल्याने फलोद्यान, मच्छशेती व कृषी उत्पादनाचे मोठे नुकसान होत आहे. त्यासाठी फलोद्यानाची गरज आहे.
कोकणात पर्यटन, फलोद्यान व मत्स्य विकासांतर्गत विद्यापीठे, संशोधन संस्था, वेधशाळा होण्याची गरज आहे. शिवाय याअंतर्गत भविष्यात काम करणारे हात निर्माण करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे.
कोकण कृषी विद्यापीठ दापोलीत आहे. पण या ठिकाणी होणारे संशोधन बागायतदार शेतकऱ्यांच्या दारात जायला हवे. कोकण व डोंगराळ भागाचा विचार करता कृषी विद्यापीठाने संशोधन थेट शेतकऱ्यांच्या हाती मिळण्यासाठी तरतूद करताना अन्नप्रक्रिया उद्योगांतर्गत केंद्राने राज्याकडे दिलेल्या प्रक्रिया उद्योगाच्या योजना कोकणच्या पदरात पडण्याची गरज आहे.
कोकणाला बदलते हवामान, तापमानाचा तसेच अवेळी कोसळणाऱ्या पावसाचा फटका बसत आहे. त्यामुळे संशोधन करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत तसेच कोकणची सर्वच पिके पीक विमा योजनेत सामावून हमीभाव देण्याची गरज आहे.
कोकणात भरपूर पाऊस पडतो. ते पाणी साठविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या योजनांचा आढावा घेऊन मोठमोठय़ा धरणापेक्षा प्रत्येक गावाचा विचार करून योजनांसाठी तरतूद केली जावी त्यामुळे कोकण दुष्काळापासून वाचेल असे बोलले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा