ग्यानबा तुकारामचा गजर करत वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघतात. सगळ्या वारकऱ्यांची वाट ही पंढरीच्या दिशेने जाते आणि आषाढीच्या दिवशी अवघा रंग एकची होतो. एका ध्यासाने पुढे पावलं टाकत कैक किलोमीटरचं अंतर वारकरी पार करत असतात. वारकऱ्यांना आस लागलेली असते ती विठ्ठलाच्या दर्शनाची. या दर्शनाबरोबरच विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तींनाही चांगलंच महत्त्व प्राप्त होतं. ही मूर्ती आपल्या डोक्यावर घेऊन अनेक वारकरी प्रवास करतात. विठ्ठल आपल्या बरोबरच आहे ही भावनाच त्यांच्या मनात असते.

विठ्ठलाच्या मूर्तींची मागणी वाढली

पंढरपूरच्या आध्यात्मिक नगरीचा महिमा मूर्ती कलेमुळे देशभरात पोहोचला आहे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणाहून मूर्ती घेऊन जाण्याची प्रथा मानली जाते पंढरी दगडी मूर्ती बनवणारे प्रमुख मूर्तीकार काम करतात पंढरी एकमेव मूर्ती बाजारपेठ म्हणून नावाजली आहे. तीर्थक्षेत्र पंढरी नगरीमध्ये विठ्ठल रखुमाई बरोबरच मोठ्या प्रमाणात विविध देवदेवतांच्या दगडी, संगमरवरी मूर्ती घडवल्या जातात. येथील मूर्तींना देशभरातून मागणी होत असते. पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी, गणपती, राधाकृष्ण, महादेवाची पिंड, नंदी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, स्वामी समर्थ, गजानन महाराज, संत महात्मा, यांसह महापुरुषांच्या मुर्ती घडवल्या जातात. तसेच फोटोंवरूनही मूर्ती या ठिकाणी कलाकार घडवत असतात. आषाढी वारीची तयारी सहा महिने आधी मूर्तीकार करत असतात या वारीत लाखो रुपयांची उलाढालही होते. अशी माहिती मूर्तीकारांनी दिली. काळ्या पाषणातून मूर्ती घडवल्या जातात. तसंच संगमरवरी मूर्तीही घडवल्या जातात.

हे पण वाचा- पालखी सोहळ्यात शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी गजर, काय आहे नियोजन ?

आषाढी वारीची तयारी सहा महिने आधीच

आषाढी वारीची तयारी आम्ही जोमाने सुरु केली आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची मागणी वाढली आहे. त्या अनुषंगाने आम्ही मूर्ती तयार केल्या आहेत. ९ इंचापासून चार फुटांपर्यंतच्या मूर्ती आम्ही तयार केल्या आहेत. साधारण १५० ते २०० मूर्ती आम्ही तयार करतो. ४ हजारांपासून ते ५० हजारांपर्यंतच्या मूर्ती आम्ही तयार करतो. आमची ही पाचवी पिढी आहे. सध्या आमच्याकडे ५० कामगार काम करतात. सध्याच्या घडीला विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींवरच जास्त काम करत आहोत. महाराष्ट्र वगळता तामिळनाडूमध्ये विठ्ठल मूर्तींची जास्त मागणी आहे. तसंच जर्मनी, अमेरिका, मॉरिशस यांसह इतर देशांमध्येही आम्ही मूर्ती पाठवल्या आहेत. वारीच्या काळात २० ते ४० लाखांची उलाढाल होते. आम्ही जानेवारीपासूनच मूर्ती तयार करण्याचं काम हाती घेतो अशी माहिती अक्षय जयसिंह मंडवाले यांनी दिली आहे.