भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार येथील जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांचा लँडमाफिया असा उल्लेख करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी दिलीपराव ठुबे प्रतिष्ठानने केली आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनाही निवेदन देण्यात आले आहे.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र ठुबे यांनी गुरुवारी नगरमध्ये पत्रकारांना ही माहिती दिली. सामान्यांचा कैवारी आणि लोकवर्गणीतून निवडणुका लढवण्याचे नाटक करणारे आझाद ठुबे यांनी ते कोटय़धीश कसे झाले याचे उत्तर द्यावे, असे आव्हान देऊन राजेंद्र ठुबे यांनी सांगितले, की आझाद ठुबे यांच्या मालकीचे मोठे भूखंड असून विविध ठिकाणी मोक्याच्या जागी बांधकामे सुरू आहेत. ते आता लँडमाफिया झाले आहेत. कान्हूरपठार गावातील विकासकामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत सामाजिक कार्यकर्ते सखाराम ठुबे यांनी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर या चौकशीचे आदेश झाले. मात्र आता आपला संपूर्ण भ्रष्टाचार उजेडात येईल, या भीतीने आझाद ठुबे यांनी विरोधकांच्या संस्था तसेच पदाधिकाऱ्यांवर आरोप सुरू केले आहेत.
आझाद ठुबे व त्यांच्या समर्थकांनी दूध संस्था व शिवाजीराजे पतसंस्थेत केलेला भ्रष्टाचार सर्वश्रुत आहे. ही पापे आता उघड होऊ लागल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. सामान्य कार्यकर्ता म्हणून मिरवणाऱ्या आझाद ठुबे यांची दहा वर्षांपूर्वीची सांपत्तिक स्थिती कशी होती, याची पूर्ण तालुक्याला चांगली माहिती आहे. लोकवर्गणीतून निवडणूक लढवून ती जिंकल्यानंतर मात्र त्यांचे थायलंड, मलेशिया दौरे सुरू झाले. गावातच लाखो रुपये किमतीची शेतजमीन त्यांनी विकत घेतली. हे पैसे कुठून आणले, याचा हिशोब त्यांनी द्यावा अशी मागणी राजेंद्र ठुबे यांनी केली आहे. राजकारणविरहित विकास साधण्यासाठीच गावात दिलीपराव ठुबे सामाजिक प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. संस्थेमार्फत विविध विकासकामे सुरू आहेत. त्याचीच आझाद ठुबे यांना पोटदुखी आहे असा आरोपही त्यांनी केला. प्रसाद शेळके, सनी सोनावळे, संतोष शेळके, बबन घुमटकर आदी या वेळी उपस्थित होते.

Story img Loader