विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पूरग्रस्त भागातील तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरातल्या चिखली गावात देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला आहे. २०१९ साली जशी मदत झाली तशी मदत यावेळी झाली पाहिजे अशी मागणी लोकांकडून करण्यात येत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
“२०१९ मध्ये आलेल्या महापूरानं प्रचंड नुकसान झालं होतं. मी आणि चंद्रकांत दादांनी तातडीने निर्णय घेत ५ हजार रोखीने १० हजार बॅंक खात्यामध्ये छोट्या दुकानदारांना ५० हजार रुपये, जनावरांच नुकसान असेल तर त्याला २० हजार रुपये तसेच घरांच्या पडझडीसाठी आपण मोठ्या प्रमाणात निधी दिला. शेतकरी असेल शेतमजूर असेल किंवा छोटा व्यावसायिक असेल या सर्वांना आपण विनाविलंब मदत करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे प्रत्येक भागातून २०१९ साली जशी मदत झाली तशी मदत यावेळी झाली पाहिजे अशी मागणी लोकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ मदत जाहीर केली पाहिजे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
“अलमट्टी आणि राधानगरीच्या विसर्गाचा प्रॉब्लेम आलेला नाही आणि पाऊसही केवळ तीन दिवस पडलेला आहे. त्यामुळे अशा परिस्थिती आपण जलमय होत असू तर कुठेतरी याचा नीट अभ्यास करुन याच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. १० – १५ वर्षांनी येणारी आपत्ती वर्षाने यायला लागली तर लोकांच जगणं मुश्किल होईल. त्यामुळे हे पाणी वळवून मराठवाडा आणि इतर दुष्काळी भागामध्ये देण्याच्या संदर्भात आराखडा आम्ही मान्य केला होता आणि जागतिक बँकेने यासाठी निधी देण्याचे मान्य केलं होतं. दुर्दैवाने सरकार बदलल्यानंतर हे पुढे जाऊ शकलेलं नाही. यावर उपाययोजना करायची असेल तर या पाण्याचा निचरा आपण बोगद्यांच्या माध्यमातून करत नाही तोपर्यंत हे पाणी साचत जाईल आणि आपल्याला अडचणींचा सामना करावा लागेल,” असे फडणवीस म्हणाले.
पहिल्या दिवशी साताऱ्याचा दौरा आटोपून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगली शहर आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणांना भेटी देत पूरग्रस्तांशी संवाद साधला होता. शिरोळ तालुक्यातील मदतसामुग्रीचे वाटप करीत त्यांनी कोल्हापूर येथे पाहणी केली.
कमेंट बॉक्समध्ये मांडा तुमचे मत… https://t.co/2jrmCKNbWi #Maharashtra #MaharashtraFlood #CMUddhavThackeray #Devendrafadnavis @OfficeofUT @Dev_Fadnavis @ShivSena @BJP4Maharashtra pic.twitter.com/y6JthWUykf
— LoksattaLive (@LoksattaLive) July 30, 2021
कोल्हापूर जिल्ह्यातील पूर ओसरला असून बहुतेक सर्व रस्ते सुरू झाले आहेत. राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद झाले असून आता ४१ बंधारे पाण्याखाली आहेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी हळूहळू कमी होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचा दौरा करत पूरग्रस्त भागांची पाहणी केली. सरकार पूरग्रस्तांच्या मदतीला कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यानुसार बुधवारी नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.