प्रत्येक प्रदेशाचे, विभागांचे वेगळे प्रश्न असतात, राज्यकर्त्यांनी ते स्थानिकांशी चर्चा करून सोडवायचे असतात, त्यामुळे महाराष्ट्राचे विभाजन करून वेगळय़ा विदर्भाची मागणी सयुक्तिक नाही, असे स्पष्ट मत घुमान येथील ८८व्या अ. भा. साहित्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू लॉ कॉलेजने आयोजित केलेल्या कॉ. बापूसाहेब भापकर स्मृती करंडक वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनासाठी डॉ. मोरे आज, गुरुवारी येथे आले होते. उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी संस्थेचे सचिव नंदकुमार झावरे, कॉ. बाबा अरगडे, रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव विश्वासराव काळे, प्राचार्य डॉ. एस. राजू आदी या वेळी उपस्थित होते.
साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी संमेलन उत्सवी व रिकामटेकडय़ांचे काम असल्याची टीका केली होती, त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मोरे यांनी नेमाडय़ांपासून माझ्यापर्यंत सर्वच साहित्यिक रिकामटेकडेच आहेत. त्याशिवाय साहित्य निर्माण होत नाही. भाषेचा स्वाभिमान असणाऱ्या सर्वाना संमेलन उत्सवी असावे असे वाटते. आपल्यालाही संमेलन उत्सवी असावे असेच वाटते, याचा पुनरुच्चार केला. संमेलनाध्यक्षाच्या निवडीवरून होणाऱ्या वादाकडे लक्ष वेधले असता मोरे म्हणाले, की लोकशाहीत वाद होतातच. जय- पराजय सुरूच असतात. वाद होतात म्हणून निवडणूकच नको, हे काही योग्य नाही. निवडणुका झाल्याच पाहिजेत.
सीमाप्रश्नावरून यंदाही संमेलनात ठराव होणारच, परंतु यंदा हा प्रश्न न्यायालयात गेल्याने त्यासंदर्भात विचार करावा लागणार आहे. सीमाप्रश्न सामंजस्याने सोडवावा लागणार आहे, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. इंग्रजी शाळांची संख्या वाढत असल्याने त्याचा परिणाम मराठी साहित्यावर होणारच, परंतु यासाठी इंग्रजी शाळांतून मराठीची सक्ती करणे योग्य नाही, तर मराठी माणसांनी त्यांच्या मुलांना मराठी शाळेतच घालणे योग्य ठरेल, असेही ते म्हणाले. अखिल भारतीय व बालसाहित्याप्रमाणेच युवावर्गासाठी स्वतंत्र संमेलन भरवण्याची आवश्यकता आहे, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
डाव्या चळवळींचा वारसा
जिल्हय़ाला डाव्या विचारांचा समृद्ध वारसा आहे. वेगवेगळय़ा डाव्या विचारांच्या चळवळी येथे झाल्या. मोठे नेतेही होते, त्यामुळे डाव्या चळवळीचा अभ्यास करण्यासाठी नगर जिल्हा उत्तम मॉडेल आहे, असेही प्रा. सदानंद मोरे स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना म्हणाले. विरोधक म्हणून काम करताना डाव्या चळवळीचा विरोध हा प्रामाणिकपणे असायचा. सध्याच्या विरोधकांचा सत्ताधाऱ्यांना होणारा विरोध हा लोकांना नुरा कुस्तीसारखा वाटतो, अशी टीकाही त्यांनी केली.
चव्हाण व पटवर्धन यांचे चरित्र लिखाण
दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण व रावसाहेब पटवर्धन यांचे जीवनचरित्र लिहिण्याचे काम सध्या सुरू आहे, लवकरच ते पूर्ण होईल, अशी माहितीही प्रा. मोरे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.

Story img Loader