पंढरपूर : पंढरपूर हे संतांचे माहेरघर आहे, इथे संतांनी, वारकऱ्यांनी साहित्य निर्मिती केली. वारकरी संप्रदाय आणि मराठी साहित्य यांचा दृढ संबंध आहे, त्यामुळे आगामी १०१ वे मराठी साहित्य संमेलन पंढरपूरमध्ये घ्यावे, अशी मागणी आ. अभिजित पाटील यांनी केली. आम्ही दोन्ही आमदार मिळून ते यशस्वी करून दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखा मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यास राज्यातून प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी आमदार समाधान अवताडे, म.सा.प.चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनीता राजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा. डॉ. द. ता. भोसले, अंजली कुलकर्णी, मृणालिनी कानिटकर, ज्योत्स्ना चांदगुडे ( पुणे), नंदकुमार सावंत, रवींद्र बेडकिहाळ (सातारा), प्रकाश होळकर, ॲड नितीन ठाकरे ( नाशिक), प्राचार्य तानसिंग जगताप ( जळगाव ), डॉ. शशिकला पवार ( धुळे – नंदूरबार), पद्माकर कुलकर्णी, ॲड जे.जे. कुलकर्णी (सोलापूर) आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील तरुण पिढीला मराठी साहित्याशी जोडून घ्यावे लागेल, त्यासाठी आगामी १०१ वे साहित्य संमेलन पंढरपूरमध्ये घ्यावे असे ते म्हणाले. यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार समाधान अवताडे म्हणाले की, संत नामदेवांनी भारतभर साहित्य पोहोचविले आहे, संत चोखोबा, संत जनाबाई यांनी साहित्य निर्मिती केली, त्यामुळे पंढरपूर, वारकरी संप्रदाय यांचे साहित्याशी अतूट नाते आहे.

या मेळाव्याचे प्रास्ताविक म.सा.प.चे विभागीय कार्यवाह कल्याण शिंदे यांनी केले. ते म्हणाले की, मसापच्या ३३ जिल्ह्यांत १०५ शाखा आहेत, पंढरपूर शाखा अतिशय सक्रिय आहे, वर्षभर विविध कार्यक्रम होत असतात असे प्रास्ताविकात माहिती दिली.

मंदिर समितीचे सदस्य जळगावकर महाराज, मसापचे विभागीय कार्यवाह कल्याण शिंदे, शाखाध्यक्ष सिद्धार्थ ढवळे, कार्याध्यक्ष अशोक माळी आणि राज्यभरातून आलेले विविध शाखांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सूत्रसंचालन अंकुश गाजरे यांनी केले, स्वागत प्रा.धनाजी चव्हाण यांनी तर आभारप्रदर्शन मंदार केसकर यांनी केले.

ग्रामीण भागातील कार्यक्रमांचा मानस

भाषेच्या संवर्धनासाठी समाजात विविध प्रकारचे प्रयत्न केले जातात. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम सातत्याने घेतले जातात. म.सा.प.चे विविध कार्यक्रम ग्रामीण भागात देण्याचा आमचा मानस आहे त्यानुसार पंढरपूरमधील शाखा मेळावा खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी केला. असे म. सा. प.चे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी म्हणाले.