महाड तालुक्यांतील ऐतिहासिक शिवथरघळ परिसरांमध्ये शासनाकडून वीज प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून या प्रकल्पाला शासनाने मंजुरीदेखील दिली आहे. अशाच प्रकारचे प्रकल्प महाड आणि पोलादपूर तालुक्यांमध्ये प्रलंबित आहेत. परंतु महत्त्वाचे असलेल्या वीज प्रकल्पाची उभारणी केल्यास या परिसराच्या विकासाला चालना मिळणार असल्याने शासनाने शिवथरघळ परिसरातील वीज प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
महाड शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर सह्य़ाद्रीच्या कुशींमध्ये डोगरकपारींत असलेल्या ऐतिहासिक शिवथरघळ परिसराला भेट दिल्यानंतर त्या ठिकाणच्या वातावरणामध्ये प्रत्येकजण रमून जातो. समर्थ रामदासस्वामी यांनी याच ठिकाणी दीर्घकाळ वास्तव्य केले आणि ‘दासबोध’ या महान ग्रंथाचे लिखाण पूर्ण केले. या ठिकाणाचे ऐतिहासिक महत्त्व पाहून शिवथरघळला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला. महाराष्ट्रांतून समर्थभक्त या परिसराला भेट देण्यासाठी येत असल्याने शिवथरघळ परिसराचा विकास झाल्यास स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
पावसाळ्यांमध्ये या परिसरांमध्ये असलेल्या नद्या दुथडी भरून वाहात असल्याने या पाण्यावर प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे लघु पाटबंधारे विभागाने सादर केला. धरणाची जागा निश्चित करण्यात आली. वीज प्रकल्प उभारण्याचे ठिकाणदेखील निश्चित करण्यात आले. आराखडा तयार करण्यात आल्यानंतर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. प्रस्तावित वीज प्रकल्पाला सुमारे ३५० कोटी खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती वसंत साळुंके यांनी दिली. सुंदरमठ सेवा समितीचे अध्यक्ष माजी आमदार संपतराव जेधे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, रायगडचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांची अनेक वेळा भेट घेऊन वीज प्रकल्पासंबधी चर्चा केली. वरील दोनही मंत्रीमहोदयांनी प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासनदेखील दिले आहे. प्रकल्प उभारल्याने परिसराच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे साळुंके यांनी सांगितले. शासन प्रकल्प जाहीर करते परंतु प्रत्यक्षात उभारला जात नाही, असा अनुभव असल्याने शिवथरघळ वीज प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरूकरण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
शिवथरघळमधील प्रस्तावित वीज प्रकल्पाचे काम सुरू करण्याची मागणी
महाड तालुक्यांतील ऐतिहासिक शिवथरघळ परिसरांमध्ये शासनाकडून वीज प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून या प्रकल्पाला शासनाने मंजुरीदेखील दिली आहे. अशाच प्रकारचे प्रकल्प महाड आणि पोलादपूर तालुक्यांमध्ये प्रलंबित आहेत.
First published on: 05-06-2013 at 06:31 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand to start proposed work of electricity project in shivtharghal