यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील शैक्षणिक सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रमोद बियाणी यांना कुलगुरूंच्या वाहनचालकाने धक्काबुक्की करत जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेचा गुरुवारी छात्रभारती आणि अत्याचारविरोधी कृती समितीने निषेध केला असून संबंधित चालकास त्वरित निलंबित करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शनिवारी दुपारी विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीत हा प्रकार घडला होता. वाहनचालक कैलास शिंदेने डॉ. बियाणी यांच्याशी कुरापत काढून वाद घातला. या वेळी शिंदेने धक्काबुक्की करत त्यांना ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. विद्यापीठात उच्चपदावरील व्यक्तीला या प्रकारे धमकाविण्याच्या घटनेचा छात्रभारतीने निषेध केला आहे. डॉ. बियाणी हे समाजवादी विचारसरणी मानणारे व परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यांना धमकाविण्याच्या प्रकाराचा छात्रभारतीचे शहराध्यक्ष राकेश पवार, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रभाकर वायचळे, अत्याचारविरोधी कृती समितीचे राहूल तुपलोंढे, अ‍ॅड. अरुण दोंदे आदींनी निषेध केला आहे. या बाबतचे निवेदन दोन्ही संघटनांनी गुरुवारी विद्यापीठाच्या कुलगुरूंना सादर केले. गुंडप्रवृत्तीच्या या वाहनचालकावर विद्यापीठाने त्वरित कारवाई करावी, शासकीय कार्यालयीन शिस्तीचा भंग तसेच संचालकांना जिवे मारण्याची धमकी देण्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेऊन शिंदेला तात्काळ निलंबित करावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा छात्रभारती व अत्याचारविरोधी कृती समितीने दिला आहे.

Story img Loader