पुणे जिल्ह्यातील भामा आसखेड, चासकमान आणि कळमोडी या धरणांमध्ये विनावापर पडून राहिलेले पाणी सोलापूरच्या उजनी धरणात सोडावे आणि उजनी धरणातून शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी सोडावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रश्नावर येत्या सोमवारी पुण्यात जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत बठक आयोजित केली होती. परंतु ती स्थगित करण्यात आल्यामुळे सोलापूरच्या पाणी प्रश्नाचा तिढा इतक्यात सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत.
भामा आसखेड धरणात ६.५ टीएमसी, चासकमान धरणात ४.५ टीएमसी आणि कळमोडी धरणात १.५ टीएमसी याप्रमाणे तिन्ही धरणांमध्ये मिळून १२.५ टीएमसी इतका पाण्याचा साठा शिल्लक आहे. या पाण्याचे कोठेही वाटप नियोजन नाही. या तिन्ही धरणांना एकही कालवा नाही. उजनी धरणात हे पाणी सोडण्यासाठी मधले अंतर केवळ ३० किलोमीटर आहे.
यापूर्वी २००२ साली आपण पुण्याचे पालकमंत्री होतो, त्यावेळी इकडे सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाचे सावट पसरले होते. तेव्हा पुण्यातून अशाच पध्दतीने उजनी धरणात पाणी सोडण्यात आले होते. त्याच पध्दतीने आतादेखील पुणे जिल्ह्यात विना वापर शिल्लक असलेले पाणी उजनी धरणात सोडावे, अशी मागणी खासदार मोहिते-पाटील यांनी शासनाकडे केली आहे. उजनी धरणात सध्या उणे साडेसहा टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असून तो ठेवला गेला आहे. उजनी धरणाच्या वर १९ धरणे आहेत.यात उजनी धरण हे शेवटच्या टोकाला आहे. पुण्याहून या धरणात पाणी सोडल्यास आणि नंतर लगेचच उजनीतून उजव्या व डाव्या कालव्यातून तसेच भीमा-सीना बोगद्यातून पाण्याचे दोन आवर्तने निघू शकतात. उजनी धरणाच्या सिंचन क्षेत्रात दोन लाख एकर शेती आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा