सोलापूर : सोलापूरच्या विमानसेवेला कथित अडथळा ठरलेली श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या चिमणीचे अनधिकृत ठरविण्यात बांधकाम पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी प्रशासनाने कारखान्या एक किलोमीटर परिसरात फौजदारी दंड संहिता कलम १४४ नुसार संचारबंदी पुकारली आहे. यात परिसरातील सर्व हाॕटेल, बार, मंगल कार्यालये, सभागृहे तसेच धार्मिकस्थळे आणि प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली आहेत.

बुधवारी दुपारपासून पुढील आदेश येईपर्यंत ही संचारबंदी राहणार आहे. पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी हा संचारबंदीचा आदेश जारी केला आहे. याशिवाय कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी व अध्यक्ष पुष्कराज काडादी यांच्यासह सर्व संचालक मंडळ तसेच सिध्देश्वर साखर कारखाना चिमणी बचावो संघर्ष समितीच्या प्रमुख नेत्यांना नजरकैदेत ठेवण्याच्या हालचालीही सुरू झाल्याचे सांगण्यात आले.

सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी सोलापूर महापालिकेने यापूर्वीच बेकायदा ठरविली आहे. या प्रश्नावर न्यायलयीन लढाईही झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने सिध्देश्वर साखर कारखान्याला चिमणी पाडण्यासाठी ४५ दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत दोन दिवसांपूर्वी संपली आहे. गेल्या २६ मे रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर भेटीत सिध्देश्वर कारखान्याच्या चिमणीला अडथळा दूर करून विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार अखेर या कारखान्याच्या चिमणीचे बांधकाम पाडण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली असून त्यासाठी बंगळुरू येथील एका कंपनीला पाचारण करण्यात आले आहे. कारखाना संपूर्ण रिकामा करण्यात येत असून आसपासच्या गावांमध्येही राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात केल्या जात आहेत. मात्र यामुळे सोलापूर शहर व परिसरातील वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Story img Loader