काँग्रेस पक्षाने संसदेत गोंधळ घालून कामकाज बंद पाडल्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज, रविवारी शहराच्या बाजार समिती चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निदर्शने केली. यावेळी काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस व खा. शरद पवार यांचा निषेध करण्यात आला. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी व पवार स्वत:च्या स्वार्थासाठी संसदेला बदनाम करत असल्याचा आरोपही खा. गांधी यांनी यावेळी बोलताना केला.
पक्षाचे झेंडे व ‘जय श्रीराम’ लिहिलेल्या टोप्या परिधान करुन भाजपच्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. संसदेचा आखाडा बनवणाऱ्या काँग्रेस व गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. काँग्रेसच्या राजवटीत गेली १५ वर्षे एकच संस्था चिक्की वाटप करीत होती, तेव्हा ती चांगली होती, ती आत्ताच कशी वाईट लागायला लागली, असा आरोपही गांधी यांनी केला. केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे भोसले, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याबाबत काँग्रेस खोटे आरोप करीत राईचा पर्वत करत आहे, असेही गांधी म्हणाले.
खा. गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगात भारताची प्रतिमा उंचावली. विविध विकास योजनांमुळे काँग्रेसची अवस्था सळो की पळो करुन सोडली आहे, काँग्रेस व राष्ट्रवादी गेली अनेक वर्षे सत्तेच्या भ्रष्टाचारात बुडाले होते, परंतु गेल्या वर्षभरात त्यांना नरेंद्र मोदी यांच्यामुळे त्यांच्या हाती काही लागले नाहीत, त्यासाठीच आरोप केले जात आहेत. संसद बंद पडल्यामुळे सरकारचे नाही तर लोकांचेच नुकसान झाले आहे, गोंधळ घालून काँग्रेस व राष्ट्रवादी विकासात अडथळा आणत आहे, परंतु आम्ही किमान ३० वर्ष तरी सत्तेतून हटणार नाही, असे गांधी म्हणाले.
यावेळी सुवेंद्र गांधी, बाबासाहेब वाकळे, श्रीपाद छिंदम, अनिल गट्टाणी, गीता गिल्डा, गीतांजली काळे, दिलीप लांडे, विश्वनाथ कोरडे, अशोक अहुजा, सोमनाथ खेडकर, डॉ. अजित फुंदे, चेतन जग्गी, मनेष  साठे आदी उपस्थित होते.
भाजपची गटबाजी
सत्ता आल्यानंतर प्रथमच रस्त्यावर उतरलेल्या जिल्हा भाजपच्या आंदोलनात पुन्हा गटबाजीचे दर्शन झाले. आजच्या आंदोलनात पक्षाचे अभय आगरकर (शहर) व भानुदास बेरड (ग्रामीण) हे दोघे जिल्हाध्यक्ष अनुपस्थित होते. याची चर्चा कार्यकर्त्यांत होती. यासंदर्भात नगरसेवक गांधी यांना विचारले असता, त्यांनी आम्ही सर्वानाच, आगरकर व बेरड यांनाही निरोप दिले होते. सत्ता नसतानाही आम्ही पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत होतो, आता सत्ता आल्यावरही आमचे प्रयत्न सुरुच आहे, त्यात कोणी सहभागी झाले नाहीतरी आमचे प्रयत्न सुरुच राहतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा