सोलापूर : भाजपच्या निलंबित राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबरांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ सोलापुरात एमआयएम पक्षाने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चातून ‘एमआयएम’ने आपल्या पक्षाचे मोठे शक्तिप्रदर्शन घडविले.
‘एमआयएम’चे जिल्हा प्रभारी फारूख शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली सिद्धेश्वर पेठेतील पठाण बागेजवळील एमआयएमच्या कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा विजापूर वेशीतून काढण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. परंतु ती नाकारली आणि पक्षाच्या कार्यालयापासून मोर्चा काढण्याचा पर्याय सुचविला. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील पूनम चौकात जेथे मोर्चा अडविला जातो, तेथून ‘एमआयएम’चे कार्यालय खूपच जवळच्या अंतरावर आहे. ठरल्याप्रमाणे निघालेल्या या मोर्चात मोठा प्रतिसाद मिळाला. हजारो जण या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाला मिळालेला प्रतिसाद पाहून ‘एमआयएम’मधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले पक्षाचे माजी जिल्हा प्रभारी तौफिक शेख व काँग्रेसचे माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी हेसुद्धा मोर्चात दाखल झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा पोहोचला, तेव्हा मोर्चाचे दुसरे टोक एमआयएम कार्यालयाजवळच होते. या वेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. मोर्चा निघण्यापूर्वी आदल्या रात्रीपासूनच पोलिसांनी संवेदनशील भागातील हालचालींवर लक्ष ठेवले होते. दरम्यान, हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला असता मोर्चेक-यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन सादर केले.