सावंतवाडी शहरात डेंग्यूसदृश साथीचे आठ रुग्ण आढळून आल्याने नगरपालिका प्रशासन व आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. डेंग्यूच्या साथीचा फैलाव होऊ नये म्हणून नगरपालिकेने युद्धपातळीवर डास निर्मूलन मोहीम आखली आहे.
सावंतवाडी शहरात गेल्या काही दिवसांत डेंग्यूसदृश साथीचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे नगरपालिकेने डास निर्मूलन यंत्रणा कामाला लावली असून, आणखी वीस कामगारांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला.
नगराध्यक्ष बबन साळगावकर, आमदार दीपक केसरकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. डी. माने, हिवताप अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना मदतीसाठी निमंत्रित केले. त्यांनी सावंतवाडीत येऊन साथ रोग नियंत्रणासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.
आमदार दीपक केसरकर यांनी गोवा बांबुळी रुग्णालयात रुग्णांवर अधिक उपचार करण्यासाठी हालचाली केल्या आहेत, तसेच उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीत साथ रोग अधिकारी नेमणूक तातडीने द्यावी म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.
पावसाने विश्रांती घेताच साथीचा फैलाव मोठा झाल्याचे जाणवत असल्याने नगरपालिका व आरोग्य यंत्रणा साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

Story img Loader