धूरफवारणीसाठी औषधांचा तुटवडा
सरकारदफ्तरी मराठवाडय़ात डेंग्यूचे आतापर्यंत ४८ रुग्ण नोंदविले गेले. पैकी सहा दगावले. आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. लक्षात आले की, डास वाढले आहेत. डास निर्मूलनासाठी मग उपाययोजनांची घाई सुरू झाली. हिवताप निर्मूलनाचे अधिकारी सरसावले. तेव्हा लक्षात आले की, राज्यात २२ ठिकाणी जागाच रिक्त आहेत! डास निर्मूलनासाठी धूर फवारणी करण्याचे ठरविले गेले. तेव्हा कर्मचाऱ्यांनी मागणी केली, ‘पायरीथ्रम’ नावाचे औषध आधी पुरवा. राज्यात डेंग्यूची मोठी साथ असतानाही धूर फवारणी व डास निर्मूलनासाठी आवश्यक ‘टेमीपोस’, ‘पायरीथ्रम’ ही औषधेच उपलब्ध नाहीत. राज्यस्तरावरून औषध खरेदीच्या निविदा निघाल्या असल्याचे सांगितले जाते.
मराठवाडय़ातील आठही जिल्ह्य़ांत डेंग्यूने पीडित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. खासगी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. सरकारी दवाखान्यांमध्ये मराठवाडय़ात ४८ रुग्ण डेंग्यूमुळे पीडित असल्याची आकडेवारी आरोग्य विभागाकडे आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ातील ग्रामीण विभागात ८ रुग्ण, तर शहरी विभागात १३ रुग्ण आढळून आले. जालना जिल्ह्य़ात ३, लातूरमध्ये १४, उस्मानाबादमध्ये ६, बीडमध्ये ३ व नांदेडमध्ये १ डेंग्यूचा रुग्ण सरकारीदफ्तरी नोंदविला गेला. जे रुग्ण सरकारी दवाखान्यात दाखल झाले, त्यापैकी ६जणांचा मृत्यू झाला. त्यातील चौघे उस्मानाबाद जिल्ह्य़ातील, तर दोघे लातूर जिल्ह्य़ातील. डेंग्यूची लागण झालेले अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे डास निर्मूलनाचे प्रतिबंधात्मक उपाय वेगाने सुरू व्हावेत, यासाठी हालचाली करण्यात आल्या.
धूर फवारणी करण्यासाठी ‘पायरीथ्रम २ टक्के’ हे औषध आवश्यक असते. त्याची किंमत १ हजार ८०० रुपये लिटर आहे. मराठवाडय़ात कोठेही त्याचे उत्पादन होत नाही. त्यामुळे बहुतांश पुरवठा सोलापूर येथून होतो. ‘टेमीपोस’, ‘पायरीथ्रम’ तसेच गटारीच्या भोवताली टाकण्याची पांढरी पावडरही उपलब्ध नसल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना जवळपास थांबल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्य़ातील २० गावांमध्ये कशीबशी फवारणी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. केवळ ‘पायरीथ्रम’ नाही तर ‘अ‍ॅबेट’चा पुरवठाही नीट होत नाही. एक लिटर ‘अ‍ॅबेट’साठी १ हजार ६६० रुपये खर्च करावे लागतात. काही ग्रामपंचायतींनी स्वखर्चाने ‘पायरीथ्रम’ विकत आणण्याची तयारीही दाखविली. मात्र, त्याचा पुरवठा सोलापूरहून होत असल्याने तेथील संपर्काचे पत्ते अधिकारी सदस्यांना आवर्जून कळवित आहेत. धूर फवारणीसाठी आवश्यक त्या प्रमाणात डिझेलही मिळत नाही. त्याचेही दर वाढले असल्याने धूर फवारणी ही खर्चिक बाब झाली आहे. त्यामुळे धूर फवारणीऐवजी ‘अ‍ॅबेट’ वापरणाऱ्यावरच भर असल्याचे आरोग्य अधिकारी सांगतात. डास निर्मूलनासाठी आरोग्य विभागाला कराव्या लागणाऱ्या कसरतीचा वरिष्ठ पातळीवरून दररोज आढावा मात्र घेतला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा