डहाणू तालुक्याच्या बंदरपट्टी भागात गेल्या दोन महिन्यांपासून अनेक गावांतील आणि घराघरांत लोक तापाने फणफणत असतानाच चिंचणी, वरोर, वाढवण, वासगाव, धाकटी डहाणू परिसरात डेंग्यूच्या रोगाची लागण झालेले रुग्ण आढळून आले असून, वासगाव येथील वसंत राऊत (वय ३२) यांचा डेंग्यूने बळी घेतला असून, त्यांच्याच घरात चारजणांना लागण झाली असल्याने त्यातील मनोहर चुरी याला मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेल्या महिनाभरापासून किनारपट्टी भागातील आणि जंगलपट्टी भागातील अनेक गावांत तापाची साथ पसरली होती. त्याचे डहाणूतील सरकारी तसेच खासगी रुग्णालयांत उपचार घेतले असता त्यातील २५ ते ३० रुग्ण डेंग्यूचे असल्याचे आढळून आले आहेत. बंदरपट्टी भागातील वातावरणात दमटपणा आणि जिथे तिथे पाण्याची डबकी, गुरांचे गोठे, शेण त्याचबरोबर घरोघरी असलेल्या शौचालयांमुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते. त्याचा प्रादुर्भाव ताप, सर्दी, खोकला अशा आजारांत होऊन काहींना डेंग्यूच्या आजाराची लागण होते. यात प्रामुख्याने चिंचणी, वरोर, वाढवण, वासगाव, धाकटी डहाणू, डहाणू, कंकाडी या गावांत मोठय़ा प्रमाणात डेंग्यूच्या रोगाची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत.
या आठवडाभरात वासगाव येथील वसंत बुधाजी राऊत (वय ३२) यांचे ७ नोव्हेंबरला बलसाड येथील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्याच घरातील आणखी चारजणांना डेंग्यूची लागण झाल्याच्या संशयाने डहाणूच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील मनोहर चुरी याला डॉक्टरांच्या पथकाने मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात दाखल केले असून, त्यालाही डेंग्यूची लागण झाली असल्याचे सांगण्यात आले, तर चिंचणी येथील रोहित अरविंद बारी यालाही डेंग्यूची लागण झाली होती. त्याला मुंबईच्या के.ई.एम. रुग्णालयात नेऊन वेळीच उपचार केल्याने त्याची प्रकृती सुधारली आहे.
दरम्यान, डहाणू तालुका सेवा दलाचे अध्यक्ष सुधाकर राऊत यांनी कंकाडी गावातील कमलेश माच्छी, महेश माच्छी, राजूभाई माच्छी आणि दीपेश माच्छी या चारजणांना डेंग्यूची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवाल दाखवून त्यांना बलसाड येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान, काल वासगाव येथे वैद्यकीय पथक दाखल झाले असून, त्यांनी घराघरांतील रुग्णांचा शोध सुरू केला आहे.

Story img Loader